रवि पत्की, क्रिकेट समीक्षक  : आयपीएल धमाका आजपासून चेन्नईला सुरु होतोय. मुंबई विरुद्ध बंगलोर असा सामना रंगणार आहे. सहाव्यांदा जिंकायच्या इर्षेने मुंबई मैदानात उतरेल तर पहिलं अजिंक्यपद मिळवण्याच्या दृष्टीने कोहली आणि त्याचा संघ सर्वस्व पणाला लावेल. मुंबईने कागदावरची शक्ती प्रत्यक्ष मैदानावर सातत्याने दाखवली आहे. सर्व संघ कागदावर लिहिले तर ह्यावेळेस सुद्धा मुंबईचा संघ सर्वाधिक संतुलित,प्रतिस्पर्ध्याच्या छातीत धडकी भरवणारा आणि कोणतीही आणीबाणीची परिस्थती यशस्वी रित्या हाताळू शकेल ह्याची खात्री देणारा वाटतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या संघात सलामीवीर,मध्यक्रम, अष्टपैलू,फास्ट बॉलर्स,स्पीन्नर्स,यष्टीरक्षक सर्वांनीच स्वतः ला सिद्ध केलय. एकंदरीत मुंबईचा संघ आयपीएल चा क्लाइव्ह लॉइडचा संघ म्हणायला हरकत नाही.बंगलोरचा संघ केवळ कोहली आणि डीविलीअर्स वर अवलंबून न राहता सांघिक कामगिरी करतो का ते बघायचे.


क्रिकेट बॅट्समनचा खेळ आहे हे टी20 मध्ये सत्य आहे.(वैविध्यपूर्ण खेळपट्ट्या आणि डीआरएस मुळे टेस्ट क्रिकेट मध्ये बॉलर्स ला समान संधी मिळत आहे असं आता नक्की म्हणता येईल).जिममध्ये जाऊन तयार केलेले पिळदार शरीर,जाड आणि जड बॅट्स,पूर्ण बॅट्समनधारजिण्या खेळपट्ट्या ह्यामुळे सिक्सर मारण्यात आता कुठली रिस्कचं राहिलेली नाही.


पूर्वी सिक्सर हा एक अकॅडेमिक शॉट होता. तो क्रिकेटमध्ये असतो आणि मारला तर सहा धावा मिळतात एव्हढच पुस्तकी ज्ञान घेऊन बॅट्समन बॅटिंगला जायचे. तो ट्राय करण्याचा विचार देखील बॅट्समन करत नसत.मुंबईहून पुण्याला जाताना जसं मध्येच बंगलोर 900 कि. मी.असा बोर्ड दिसतो आपण तो नुसता बघतो आणि पुढे जातो. 


आपल्याला बंगलोरला काही जायचे नसते.तसेच सिक्सरचे होते. सहा धावा फक्त माहित होत्या.कुणी नादी लागत नसे.विजय मांजरेकरांनी तर 55 टेस्ट खेळून सुद्धा एकही सिक्सर मारली नव्हती.गावस्करने सुद्धा करिअरच्या शेवटी शेवटी सिक्सर आजमावून पाहिली होती. पण टी 20 हे सिक्सर चेच क्रिकेट आहे.आता टी20 मध्ये चौकार ही चहाची टपरी आहे तर सिक्सरला थ्री स्टार हॉटेलचा दर्जा आहे.


जो सर्वाधिक सिक्सर खेचतो तो किंग. मग साहजिकच मॅच विनर्स कोण असतात? लांब लांब आणि सातत्याने सिक्सर खेचणारे बॅट्समन? चूक. सहज सिक्सर मारता येत असल्या तरी शकलेनी, धुर्तपणे,वैविध्याने सिक्सर रोखून धरणारे गोलंदाज हेच मॅच विनर्स. बॅट्समन च्या खेळात मॅच जिंकून देतात ते बॉलर्सच.पोवर प्ले मध्ये जबाबदारी घेणारे,मधल्या ओव्हर्स मध्ये विकेट्स काढणारे,डेथ ओव्हर्स मध्ये बॅट्समनला जखडून ठेवणारे बोलर्सच मॅच जिंकून देतात.


बुमराह आणि ट्रेंट बोल्ट हे सैनी आणि सिराज पेक्षा उजवे आहेत. बंगलोरचे सुंदर,झँम्पा आणि चहल मुंबईच्या स्पीन्नर्स पुढे उजवे वाटतात.त्यामुळे दोन चांगल्या संतुलित संघाचा सामना आहे. सहज सिक्स मारता येत असल्या तरी'सिक्स है तो रिस्क है' हा मंत्र प्रत्यक्षात उतरवू शकणारे बॉलर्स आयपीएल मध्ये सर्वात महत्वाची कामगिरी करणार. 
लेट द शो बिगीन. विश यु ऑल द फन.