मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे आयपीएलचा (IPL 2021) हंगाम मध्येच थांबवण्यात आला होता. आता या स्पर्धेचं दुसरं पर्व येत्या 19 सप्टेंबरपासून पुन्हा एका नव्या जोमाने सुरु होत आहे. दुबई, शारजा आणि आबु धाबीमधील मैदानांवर आयपीएलचे उर्वरित सामने खेळवले जाणार आहे. कोरोना नियमांचे पालन करुन आणि युएई सरकारने आखून दिलेल्या नियमांनुसार या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात पहिला सामना पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि तीन वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात होणार आहे. हा सामना क्रिकेटी चाहत्यांसाठी खास असणार आहे, कारण इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रेक्षकांना मैदानात प्रवेश मिळणार आहे. बीसीसीआयने (BCCI) यासाठी परवानगी दिली आहे. 



तिकीट बुकिंगसंदर्भातील सर्व माहिती आयपीएल साइटवर शेअर करण्यात आली आहे. चाहते 16 सप्टेंबरपासून तिकीट बुक करू शकतात. अधिकृत वेबसाईट www.iplt20.com व्यतिरिक्त, PlatinumList.net साईटवरूनही तिकीट बुकिंग करता येणार आहे. लीगच्या आयोजकांनी स्टेडियममध्ये किती प्रेक्षक उपस्थित असतील हे सांगितलं नसलं तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्टेडियमच्या क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला जाईल.


तब्बल 28 महिन्यांनंतर प्रेक्षक स्टेडियममध्ये परतत आहेत. मे 2019 मध्ये भारतात झालेल्या आयपीएलच्या 12 व्या हंगामाच्या शेवटच्या वेळी प्रेक्षक मैदानावर उपस्थित होते. यानंतर, 2020 मध्ये यूएई आणि 2021 मध्ये भारतात आयोजित पहिल्या टप्प्यात, प्रेक्षकांना मैदानात प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे बीसीसीआयला पहिल्या टप्प्यातील नुकसानीची भरपाई करता येणार आहे.


आयपीएलचे उर्वरित 31 सामने दुबई, शारजाह आणि आबू धाबी येथे 27 दिवसात खेळले जातील. आयपीएल 2021चा पहिला टप्पा कोरोना प्रादुर्भावामुळे 4 मे रोजी पुढे ढकलण्यात आला. 2 मे पर्यंत एकूण 29 सामने खेळले गेले होते.


पहिल्या टप्प्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आठ सामन्यांत सहा विजयांसह पहिल्या स्थानावर आहे तर चेन्नई सुपर किंग्स पाच विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी (Royal Challengers Bangalore) संघ पाच विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे.