मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीगच्या 15 व्या हंगामासाठी खेळाडूंचं मेगा ऑक्शन (Mega Auction) असणार आहे. याआधी खेळाडूंना रिटेन करण्याचे नियम (Retention Policy) समोर आले आहेत. याची अद्याप अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार आयपीएलमधले जुने आठ संघ चार खेळाडूंना कायम ठेवू शकतात. (IPL 2022 auction retention rules Old teams can keep 4 players)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये नव्याने सहभागी झालेल्या अहमदाबाद (Ahmedabad) आणि लखनऊ (Lucknow) संघाला इतर संघांच्या करारातुन मुक्त झालेल्या प्रत्येकी तीन खेळाडूंना संघात घेता येणार आहे. जर भारतीय संघातील मोठे खेळाडू लिलावात सहभागी झाले नाहीत, तर नवीन संघांना बोली लागण्यापूर्वी अधिकच्या दोन परदेशी खेळाडूंना संघात घेण्याची सुट असेल.


खेळाडूंना संघात कायम ठेवताना अनेक अटींचं पालन करावं लागणार आहे. नव्या नियमानुसार संघ चार खेळाडूंना रिटेन करु शकतात, यात तीन भारतीय आणि एक परदेशी खेळाडूचा समावेश असेल. किंवा दोन भारतीय आणि दोन परदेशी खेळाडूंना रिटेन करु शकतात. कोणताही संघ दोनपेक्षा जास्त अनकॅप्ड खेळाडू (जे भारताकडून खेळलेले नाहीत) ठेवू शकणार नाहीत.


मेगा ऑक्शनसाठी फ्रँचाईजिंच्या रकमेतही वाढ होणार आहे. गेल्या वर्षीच्या 85 कोटींच्या तुलनेत यंदा संघाला खेळाडूंवर बोली लावण्यासाठी 90 कोटी रुपयांपर्यंत मर्यादा वाढवण्यात आली आहे. 2023 मध्ये हीच रक्कम 100 कोटींवर पोहचेल.


आयपीएलच्या पंधराव्या हंगामात जुन्या फ्रँचाईजी (Franchise) अनेक दिग्गज खेळाडूंना करारमुक्त करण्याची शक्यता आहे. यात के एल राहुल, डेव्हिड वॉर्नर, हार्दिक पांड्य़ा, जोफ्रा आर्चर सारख्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे अहमदाबाद आणि लखनऊला या खेळाडूंना आपल्या संघात सहभागी करुन घेण्याची चांगली संधी आहे.


यावेळी आयपीएल लिलावात आधीच सहभागी असलेल्या आठ संघांना 'राईट टू मॅच कार्ड' वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. मात्र, बीसीसीआयने अद्याप लिलावाचे नियम अधिकृतपणे जाहीर केलेले नाहीत.