IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) आयसोलेशन पूर्ण केल्यानंतर पुन्हा संघात सामील झाला आहे. गेल्या काही दिवसात दिल्ली कॅपिटल्सच्या काही खेळाडू आणि सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. रिकी पाँटिंगच्या कुटुंबातील एका सदस्यालाही कोरोना झाला होता, त्यानंतर त्याने स्वतःला आयसोलेट केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिकी पॉण्टिंगने सांगितला अनुभव
रिकी पाँटिंगने आता त्याचा आयसोलेशनमधला अनुभव शेअर केला आहे.  संघासोबत प्रवास करता येत नसल्याने आपण रागाच्या भरात टीव्हीचे तीन-चार रिमोट तोडल्याचं पॉण्टिंगने म्हटलं आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात रिकी पाँटिंग संघासोबत नव्हता, या सामन्यात शेवटच्या षटकात नो-बॉलवरून गदारोळ झाला होता.


रिकी पाँटिंगने सांगितलं, मी टीव्हीचे तीन-चार रिमोट तोडले, तीन-चार पाण्याच्या बाटल्या फेकल्या. जेव्हा तुम्ही प्रशिक्षक म्हणून खेळापासून दूर असता आणि गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा खूप राग येतो, असं पॉण्टिंगने म्हटलं आहे. पंजाबविरुद्धच्या विजयानंतर संघ पुन्हा रुळावर येईल असे वाटलं होतं, पण राजस्थानविरुद्ध आम्ही हरलो अशी खंत पॉण्टिंगने व्यक्त केली.


दिल्ली कॅपिटल्सचा संघ सुरुवातीच्या ओव्हरर्समध्ये चांगली करत आहे, पण शेवटच्या तीन चार ओव्हर्समध्ये कमी पडत आहे, आणि इथेच बाजी पलटते, अशी कबुली पॉण्टिंगने दिली आहे. 


राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा शेवटच्या ओव्हरमध्ये पराभव झाला. टीमला 6 चेंडूत 36 धावा हव्या होत्या, फलंदाजाने लागोपाठ तीन षटकार ठोकले. मात्र त्यानंतर नो-बॉलवरून वाद झाला.


दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने आपल्या फलंदाजांना क्रीजवरून माघारी बोलावलं होते, तर प्रशिक्षक प्रवीण आमरे सामन्यादरम्यानच मैदानात दाखल झाले होते. प्रवीण आमरेला नंतर एक सामन्याचा दंड ठोठावण्यात आला, तर ऋषभ पंतला त्याच्या मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला.