IPL 2023 CSK Ban: IPL मध्ये गेले काही सामने अत्यंत अटीतटीचे झाले असल्याने क्रिकेट चाहत्यांचा उत्साह शिगेला आहे. मात्र यादरम्यान दुसरीकडे तामिळनाडूत (Tamil Nadu) आयपीएलवरुन राजकीय वातावरण तापलं आहे. मंगळवारी पीएमके संघाच्या एका आमदाराने विधानसभेत IPL चा मुद्दा उपस्थित करत चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघात एकही तामिळ खेळाडू का नाही? अशी विचारणा केली आहे. इतकंच नाही तर या मुद्द्यावर संघावर बंदी घातली पाहिजे असंही ते म्हणाले आहेत. विधानसभेत क्रीडा अर्थसंकल्पावर चर्चा सुरु असताना धर्मपुरी येथील पीएमकेचे (पाट्टाली मक्कल कॉची पार्टी) आमदार वेंकटेश्वरन यांनी चेन्नईवर बंदीची मागणी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई सुपरकिंग्ज संघ तामिळनाडूचा आहे, पण संघात तामिळ खेळाडूंना स्थान देण्यात आलेलं नाही. संघात तामिळनाडूचा एकही खेळाडू नाही असं वेंकटेश्वरन म्हणाले आहेत. संघात तामिळनाडूचे खेळाडू नाहीत, मात्र राज्याच्या नावे महसूल कमावला जात आहे असा आरोप वेंकटेश्वरन यांनी केला आहे. 


CSK संघात तामिळनाडूच्या खेळाडूला खेळवण्याची मागणी


विधानसभेतून बाहेर पडल्यानंतर वेंकटेश्वरन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की "आपल्याकडे अनेक खेळाडू आहेत. चेन्नई सुपरकिंग्जला तामिळनाडूच्या राजधानीचं नाव देण्यात आलं आहे. आपल्याच राजधानीचं नाव असंण, पण राज्याचा एकही खेळाडू संघात नसणं हे दुर्दैवी असल्याचं मला अनेकांनी सांगितलं. मी केवळ विधानसभेत हा मुद्दा मांडला आहे. या मुद्द्यावर मंत्र्यांनी विधानसभेत उत्तर दिलं नाही. पण मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यावर कारवाई करतील अशी मला आशा आहे. जर तामिळनाडूतच तामिळ व्यक्तींना महत्त्व दिलं नाही तर इतर ठिकाणीही मिळणार नाही".


IPL सामन्यावरुन वाद


याशिवाय AIDMK आमदाराने आयपीएलच्या सामन्याचा पास मागितला होता, त्यावरुनही वाद निर्माण झाला आहे. एसपी वेलुमणी यांचा दावा आहे की, "राज्यात AIDMK चं सरकार असताना त्यांना सामन्याचे पास देण्यात आले होते. सध्याच्या सरकारकडे 400 पास असतानाही AIDMK च्या आमदारांना एकही पास देण्यात आलेला नाही"


"आम्ही जेव्हा तिकीट मागितली तेव्हा राज्याचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी बीसीसीआयचे प्रमुख जय शाह यांच्याकडे तिकीट मागा असं सांगितलं", असं एसपी वेलुमणी यांनी सांगितलं. विरोधी पक्षाचे नेते वेलुमणी यांनी AIDMK सरकारला तिकीट मिळायचे असा दावा करत तिकीट मागितले आहेत. पण गेल्या चार वर्षांपासून राज्यात आयपीएलचा सामना झालेला नाही. मी आपल्या पैशांनी 150 जणांना सामना दाखवण्यासाठी घेऊन गेलो होतो असं वेलुमणी म्हणाले आहेत. 


वेलुमणी यांनी क्रीडामंत्र्यांना सांगितलं आहे की, आपण तिकीट मिळावेत यासाठी मध्यस्थी करण्याचं आवाहन केलं आहे.