RR vs CSK: अजिंक्य रहाणेला धमकावणं `या` खेळाडूला पडलं भारी; मंकडिंगला दिलं प्रत्युत्तर
IPL 2023 CSK vs GT: आयपीएल 2023 चा 17 वा सामना बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. धोनीच्या चेन्नईने राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात 176 धावांचा पाठलाग केला तेव्हा अजिंक्य रहाणे आणि रवी अश्विन यांच्यात वेगळीच लढत झाल्याचे पाहायला मिळाले.
IPL 2023 CSK vs GT : एकदिवसीय क्रिकेटपासून आयपीएलपर्यंत सध्या मंकडिंगचीच (Mankading) जोरदार चर्चा आहे. भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा गेल्या काही वर्षात मंकडिंगमुळे फारच चर्चेत आला आहे. जेव्हा जेव्हा नॉन-स्ट्राइक एंडवर धावबाद होण्याची वेळ येते तेव्हा रविचंद्रन अश्विनचा उल्लेख सर्वात आधी केला जातो. बुधवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या (RR vs CSK) आयपीएल 2023च्या सामन्यातही अश्विनच्या मंकडिंगचीच चर्चा होती. मंकडिंगवरुन समोरच्या संघातील खेळाडूंना दडपणात आणणाऱ्या अश्विनला मात्र यावेळी जोरदार प्रत्युत्तर मिळालं आहे तेसुद्धा फॉर्मात आलेल्या अजिंक्य रहाणेकडून (Ajinkya Rahane). चेन्नईकडून खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेने अश्विनच्या मंकडिंगला दिलेल्या प्रतिक्रियेची सामन्यापेक्षा जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र या सामन्यात अवघ्या तीन धावांमुळे चेन्नईचा पराभव झाला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील रोमांचक सामन्यात आर अश्विन त्याच्या फलंदाजीसह गोलंदाजीमुळे सध्या चर्चेत आहे. या सामन्यात अश्विनने अजिंक्य रहाणेला मंकडिंगसाठी धमकावत होता पण रहाणेनेही त्याला तसंच उत्तर दिलं आहे. त्यानंतर याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दोन्ही खेळाडूंमधील या थराराचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीही आरसीबी आणि लखनऊ सुपरजायंट्सच्या सामन्यात अश्विनने अशीच धमकी दिली होती. मात्र आता चेन्नई आणि राजस्थानच्या सामन्यातही असाच काहीसा प्रकार घडला.
नेमकं काय घडलं?
सहाव्या षटकात रविचंद्रन अश्विन पहिल्यांदा गोलंदाजी करायला आला. अजिंक्य रहाणे आघाडीच्या स्ट्राईकवर तर डेव्हॉन कॉनवे नॉन स्ट्राईक एंडवर उपस्थित होता. दुसरा चेंडू टाकत असताना अश्विन अचानक थांबला आणि त्याने चेंडू टाकला नाही. अश्विन नॉन-स्ट्रायकर असलेल्या फलंदाजाला घाबरण्यासाठी धमकावत असतो. मात्र यावेळी त्याचा हेतू वेगळा वाटत होता. त्याला यावर अजिंक्य रहाणे काय प्रतिक्रिया देतो हे पाहायचे होते. पुढच्या बॉलसाठी अश्विन पुन्हा रनअपवर गेला, पण आता अजिंक्यने दिलेले उत्तर पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. अश्विनने चेंडू सोडण्याआधीच रहाणे स्टंप सोडून बाजूला गेला. यावेळी संपूर्ण स्टेडियम अवाक होऊन हे पाहत होतं.
पुढच्या चेंडूवर अजिंक्य रहाणेने रविचंद्रन अश्विनच्या चेंडू डिफेंड केला. पण पुढच्याच चेंडूवर रहाणेने षटकार ठोकला. मात्र या अपमानाचा बदला अश्विनने 10व्या षटकात घेतला. तिसऱ्या चेंडूवर त्याने अजिंक्य रहाणेला एलबीडब्ल्यू आऊट केले. यासह पाचव्यांदा अश्विनने रहाणेला बाद केले.
दरम्यान, राजस्थान रॉयल्सच्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची दमछाक झाली. सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर महेंद्र सिंह धोनीने 17 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. तर रवींद्र जडेजाने 15 चेंडूत नाबाद 25 धाव्या केल्या. शेवटच्या षटकात विजयासाठी 21 धावा आणि शेवटच्या चेंडूवर पाच धावा हव्या होत्या. पण महेंद्रसिंह धोनीला आवश्यक षटकार मारता आला नाही.