IPL 2023 दरम्यानच क्रिकेटपटूकडून एकाएकी Retirement ची घोषणा; क्रिकेटप्रेमींना धक्का
IPL 2023 : आयपीएल स्पर्धेला आता खऱ्या अर्थानं रंगत आली असून, अनेक खेळाडू नव्यानं प्रकाशझोतात येताना दिसत आहेत. त्यातच एका खेळाडूनं मात्र क्रिकेट जगतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेत क्रिकेटप्रेमींना धक्का दिला आहे.
IPL 2023 : यंदाच्या वर्षी आयपीएलच्या 16 व्या पर्वामध्ये बऱ्याच नव्या गोष्टी पाहायला मिळाल्या. अगदी नवख्या खेळाडूंच्या दमदार कामगिरीपासून स्टँड्समध्ये बसलेल्या क्रिकेटप्रेमींच्या या खेळाप्रती असणाऱ्या वेडापर्यंत सर्वकाही एकदम तोड. अशी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं रंगत धरत असतानाच क्रिकेट जगतातून एक मोठी घडामोड समोर आली आहे. इथे आयपीएलचा धडाका सुरु असतानाच तिथे या खेळाडूनं मात्र क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन देशांतून आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणाऱ्या आणि एका देशातून क्रिकेट विश्वचषकामध्येही सहभागी होणाऱ्या या क्रिकेटपटूचं नाव आहे गॅरी बॅलेन्स (Gary Ballance). 33 वर्षी गॅरीनं इतक्या लवकरच क्रिकेट जगतातून काढता पाय घेतल्यामुळं क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. (ipl 2023 Gary Ballance Announced His Retirement see his career)
झिम्बाब्वेमध्ये जन्मलेल्या गॅरीची क्रिकेट कारकिर्दी लक्षवेधी ठरली आहे. कारण, तो या देशात जन्मला असला तरीही त्यानं क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात इंग्लंडमधून केली होती. भारताविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्येही तो इंग्लंडच्या संघातून खेळला होता. पण, त्यानंतर त्यानं झिम्बाब्वेच्या संघात जाण्याचा निर्णय घेतला.
गॅरीविषयी 'हे' माहितीये का?
यंदाच्याच वर्षी वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या संघांमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये गॅरीनं कमाल कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानं झिम्बाब्वेच्या संघातून पाचव्या स्थानावर येत फलंदाजी करत बिनबाद 137 धावा केल्या होत्या. तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतामध्ये दोन देशांच्या वतीनं शतकी खेळी करणारा तो दुसरा फलंदाज ठरला होता.
हेसुद्धा वाचा : RR vs LSG: ना बॅट चालली ना बॉल; पण एका कॅचने ठरला 'तो' विजयाचा हिरो!
33 वर्षीय गॅरीनं इंग्लंडसाठी 2014 आणि 2017 दरम्यान 23 कसोटी सामने, 16 एकदिवसीय सामने खेळले. ज्यानंतर मागील वर्षी त्यानं झिम्बाब्वेच्या संघातून खेळण्यासाठी दोन वर्षांचा करार केला होता. इंग्लंडच्या संघात स्थान न मिळाल्यामुळं गॅरीनं बरेच मोठे निर्णयही घेतल्याचं पाहायला मिळालं. झिम्बाब्वेमध्ये स्थानिक पातळीवरही तो मोठ्या प्रमाणावर या खेळात योगदान देताना दिसला. गॅरी बॅलेन्स यानं झिम्बाब्वेसाठी 12 जानेवारीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील टी20 सामना खेळला होता. हा त्याच्या कारकिर्दीतील पहिलावहिला टी20 सामना ठरला होता.
इथं आयपीएलची स्पर्धा सुरु असतानाच क्रिकेट जगतातून एका खेळाडून या खेळालाच रामराम ठोकणं ही आश्चर्यकारक घटना असून, सध्याच्या घडीला गॅरीनं दिलेल्या योगदानासाठी अनेक क्रिकेटप्रेमी आणि या क्षेत्रातील मंडळी त्याला पुढील जीवनासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.