MS Dhoni Viral Photo: महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आजही अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनावर तो राज्य करत आहे. भारतीय संघाकडून धोनी खेळत नसला तरी आयपीएलच्या निमित्ताने मात्र त्याला मैदानात पाहणं चाहत्यांसाठी एक पर्वणीच आहे. आयपीएलच्या (IPL) निमित्ताने चेन्नईत धोनीच्या चाहत्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. याचं कारण धोनीच्याच नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघ आयपीएलमधील एक यशस्वी संघ होऊ शकला आहे. यामुळेच त्याला तिथे 'थाला' असं संबोधित केलं जातं. धोनीचे चाहते प्रत्येक वयोगटात आहेत. नऊ वर्षाच्या मुलापासून ते 90 वर्षापर्यंत अनेकांसाठी धोनी आवडता खेळाडू असून अक्षरश: त्याला पूजतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीचे चाहते त्याच्यावर किती प्रेम करतात हे दर्शवणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोत 88 वर्षांच्या आजीबाई धोनीला अगदी आपल्या मुलाप्रमाणे जवळ घेत गालावर किस करत आपलं प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. हा फोटो पाहून अनेकजण भावूक झाले असून, धोनीचं कौतुक करत आहेत. पण यावेळी या आजी कोण आहेत? अशीही चर्चा सुरु आहे. 


या आजीबाई कोण?


41 वर्षीय धोनीने नुकतीच भाजपा नेत्या खुशबू सुंदर (Khushbu Sundar) यांच्या सासूबाईंची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. 


ट्विटरला धोनीचे सासूबाईंसोबतचे फोटो शेअर करत खुशबू सुंदर यांनी लिहिलं आहे की "हिरो तयार केले जात नाही, ते जन्मतात. धोनीने हे सिद्ध केलं आहे. धोनीने दाखवलेलं प्रेम आणि आपुलकी यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. तो माझ्या 88 वर्षाच्या सासूबाईंना भेटला. माझ्या सासूबाई त्याची पूजा करतात आणि त्याच्या पलीकडे काही पाहू शकत नाही. माही, तू तुझ्या आयुष्यात चांगल्या प्रकृतीची आणि आनंदाची अनेक वर्षं जोडून घेतली आहेस. माझा तुला प्रणाम. ज्यांच्यामुळे हे शक्य झालं त्या चेन्नई संघाचे आभार".



दरम्यान चेन्नईचा माजी स्टार खेळाडू केदार जाधवने ऋतुराज गायकवाड हा महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी ठरु शकतो असं भाकित वर्तवलं आहे. सध्याचं आयपीएल हे धोनीचं अखेरचं असू शकतं. या हंगामानंतर धोनी कदाचित आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर करु शकतो. केदार जाधवने ऋतुराजसह बेन स्टोक्सही कर्णधारपद सोपवण्यासाठी योग्य खेळाडू असल्याचं म्हटलं आहे. पण जर त्याच्याकडे नेतृत्व सोपवायचं असेल तर त्याने चांगला खेळ करणं गरजेचं असल्याचं त्याने सांगितलं आहे. 


"मला वाटतं धोनीनंतर ऋतुराज गायकवाड चेन्नईचा कर्णधार होऊ शकतो. बेन स्टोक्स हादेखील रवींद्र जडेजासोबत कर्णधार होऊ शकतो. पण त्यासाठी स्टोक्सला खूप चांगलं खेळावं लागणार आहे. उपलब्ध असणं हेदेखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला वाटतं ऋतुराज हा धोनीनंतर कर्णधारपदासाठी सर्वोत्तम पर्याय आहे," असं केदार जाधवने म्हटलं आहे.