PBKS vs LSG : इंडियन प्रिमियर लीगच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील 38व्या सामन्यात लखनऊ आणि पंजाबचा संघ एकमेकांना भिडणार आहे. पंजाबच्या आय एस बिंद्रा स्टेडियमवर पंजाब किंग्ज (PBKS) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात सामना होणार आहे. आयपीएलच्या या हंगामात दुसऱ्यांदा हे दोन्ही संघ एकमेकांना भिडणार आहेत. गेल्या सामन्यात पंजाबच्या संघाने जबरदस्त पुनरागमन करत मुंबईचा (MI) पराभव केला होता. त्यामुळे या सामन्यातही पंजाबचा उत्साह कायम असणार आहे. दुसरीकडे लखनऊच्या संघाला गेल्या सामन्यात गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे या सामन्यात लखनऊला विजयाची आवश्यकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार सॅम करणच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत आहे. तर गोलंदाजीमध्ये अर्शदीप सिंगने सर्वांना प्रभावित केले आहे. पंजाबचा संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. तसेच पंजाबच्या संघाने आतापर्यंत 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर लखनऊ सुपर जायंट्ससाठी हा हंगाम इतका काही चांगला गेलेला नाही. गुजरातविरुद्धच्या सामन्यात लखनऊचा केवळ 7 धावांनी पराभव झाला होता. लखनऊनेही 7 सामन्यांपैकी चारमध्ये विजय मिळवून गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले आहे.


खेळपट्टीची कोणाला साथ?


मोहालीत असलेल्या आय एस बिंद्रा स्टेडियमच्या खेळपट्टीवर गेल्या सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पडत आहे. त्यामुळे फलंदाजांसाठी ही खेळपट्टी उत्तम साथ देत आहे. मात्र गोलदाजांना अधिकची मेहनत करावी लागत आहे. असे असले तरी वेगवान गोलंदाज या खेळपट्टीवर चमत्कार दाखवू शकतात. आतापर्यंत झालेल्या 59 आयपीएल सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 33 वेळा विजय मिळवला आहे. तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 26 वेळा सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणे हा येथे चांगला निर्णय होऊ शकतो.


अशी असू शकते प्लेइंग 11


पंजाब किंग्ज - अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टन, सॅम करण (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत सिंग भाटिया, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.


लखनऊ सुपर जायंट्स - केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, आवेश खान, रवी बिश्नोई, अमित मिश्रा, नवीन उल हक.


कुठे पाहाल सामना?


पंजाब विरुद्ध लखनऊचा सामना संध्याकाळी 7:30 पासून खेळवला जाणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर केले जाणार आहे. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' अॅपवर उपलब्ध असणार आहे.