IPL 2023: आयपीएलमधून राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ बाहेर पडला आहे. दरम्यान, संघाला मोक्याच्या क्षणी गरज असताना त्यांचा हुकमी एक्का असणारा गोलंदाज आर अश्विन (R Ashwin) मात्र खेळला नाही. प्ले-ऑफमध्ये (Playoff) संघाला स्थान मिळवण्यासाठी गरज असताना गेल्या आठवड्यात पंजाब किंग्सविरोधातील (Punjab Kings) महत्त्वाच्या सामन्यात अश्विन अनुपस्थित होता. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) टॉसदरम्यान, अश्विनला पाठीचा त्रास असून त्याला खेळणं शक्य नाही असं सांगितलं होतं. दरम्यान यावेळी संजू सॅमसनने अश्विनच्या पाठीच्या त्रासाबद्दल सविस्तरपणे सांगितलं नव्हतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर अश्विनने आपल्या पाठीच्या त्रासाबद्दल सांगितलं असून, नेमका हा त्रास कशामुळे झाला याची माहिती दिली आहे. आपल्या युट्यूब चॅनेलवर आऱ अश्विनने याचा खुलासा केला आहे. त्याने सांगितलं की, आपण मऊ सोफ्यावर झोपल्याने पाठ दुखायला लागली होती. आपण नेहमी जमिनीवर झोपतो अशी माहिती यावेळी त्याने दिली. 


"मी नेहमी जमिनीवर झोपतो. पण धरमशाळा येथे मी मऊ बेडवर झोपलो होतो. अचानक माझ्या पाठीत कळ आली आणि ती दुखू लागली. मी घरी आल्यानंतर पाठ बरी झाली. आयपीएलमध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत असतो. त्यात माझं वयही वाढत चाललं आहे," असं आर अश्विनने सांगितलं. 


याचवेळी आर अश्विनने जर संघ प्ले-ऑफमध्ये गेला असता तर आपण खेळण्यासाठी फिट होतो असंही सांगितलं. याचाच अर्थ ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपसाठी आर अश्विन उपलब्ध असणार आहे. आयसीसी फायनलच्या आधी आधीच अनेक खेळाडूंच्या दुखापतीमुळे भारतीय संघाला मोठा फटका बसला आहे. त्यातच आणखी काही खेळाडू जखमी झाले तर रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 


राजस्थान संघाने 14 पैकी फक्त 7 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत ते पाचव्या स्थानावर राहिले. त्यांची सुरुवात सकारात्मकपणे झाली होती, पण नंतरच्या सामन्यात मात्र ते मागे पडले. अखेरच्या टप्प्यात ते चांगली कामगिरी करु शकले नाही आणि स्पर्धेतून बाहेर पडले. 


राजस्थान चांगली कामगिरी करु न शकण्यामागे जो बटलरची खराब कामगिरी कारणीभूत ठरली. फलंदाजीत बटलर चांगली कामगिरी करण्यात असमर्थ ठरला आणि 5 वेळा शून्यावर बाद झाला. शेवटच्या तीन सामन्यात तो चांगली खेळी करु शकला नाही. कर्णधार संजू सॅमसनही फलंदाजीत अपेक्षित कामगिरी करु शकला नाही. 14 सामन्यात तो फक्त 362 धावा करु शकला. त्याने तीन अर्धशतकं केली आणि दोन वेळा शून्यावर बाद झाला.