IPL 2023: यंदा आयपीएल कोण जिंकणार? गावस्करांनी घेतलं `या` संघाचं नाव; कारणही सांगितलं
Sunil Gavaskar On Who Will Win IPL 2023: यंदाचं इंडियन प्रिमिअर लिगचं पर्व 31 मार्चपासून सुरु होणार आहे. यंदाच्या पर्वामध्ये कोणता संघ बाजी मारेल यासंदर्भात दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आपलं मत मांडलं आहे.
Who Will Win IPL 2023: इंडियन प्रिमिअर लिग (IPL) म्हणजेच आयपीएलचं यंदाचं पर्व 31 मार्चपासून सुरु होणार आहे. अनेक संघांनी आपला सराव सुरु केला आहे. यंदाच्या पर्वाचा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्समध्ये रंगणार आहे. आयपीएल अवघ्या 2 आठवड्यांवर आलेलं असतानाच यंदाच्या पर्वात काय काय होणार याबद्दलच्या शक्यता आणि चर्चांना सुरुवात झाली आहे. अशातच भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी आयपीएल संदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे.
गावस्करांनी कोणाच्या बाजूने दिला कौल
गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना यंदाचं आयपीएलचं पर्व कोणती टीम जिंकू शकते याबद्दल आपलं मत मांडलं आहे. गावस्कर यांनी यंदाचं आयपीएलचं पर्व रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ जिंकले असं म्हटलं आहे. भारताच्या या माजी कर्णधाराने आपली भूमिका मांडताना, "त्यांना मागील पर्वातील आपली कामगिरी विसरावी लागेल. जसप्रीत बुमराह यंदाच्या आयपीएलच्या पर्वामध्ये खेळणार नसला तरी मुंबईच्या संघाकडे असे खेळाडू आहेत. जे त्यांना स्पर्धा आणि चषकापर्यंत घेऊन जाऊ शकतात. मी या संघाला सध्याच्या स्थितीत नक्कीच टॉप 3 मध्ये पाहतोय," असं म्हटलं आहे.
मुंबईची कामगिरी कशी?
आयपीएलच्या मागील पर्वामध्ये म्हणजेच आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सच्या संघाने चषक पटकावला होता. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच आयपीएल खेळणाऱ्या गुजरातच्या संघाने भन्नाट कमागिरी करत आपल्या पदार्पणाच्या पर्वातच थेट जेतेपदापर्यंत मजल मारली होती. मुंबई इंडियन्सच्या संघाबद्दल सांगायचे झाल्यास, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या संघाने तब्बल 5 वेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे. मुंबईचा संघ हा सर्वाधिक वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणार संघ आहे. यंदाच्या पर्वामध्ये मुंबईचा पहिला सामना 2 एप्रिल रोजी होणार असून तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाविरुद्ध आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये बुमराह एकही सामना खेळू शकणार नसल्याने मुंबईच्या संघाला अन्य गोलंदाजांवर अवलंबून राहवं लागणार आहे.
मुंबईनंतर हा संघ फेव्हरेट
मुंबई खालोखाल चेन्नई सुपर किंग्जलाही जेतेपदाचा प्रमुख दावेदार मानलं जात आहे. मुंबईनंतर सर्वाधिक वेळा ही स्पर्धा जिंकणारा संघ यंदाच्या पर्वात महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. हे पर्व धोनीचं अंतिम पर्व असेल अशी शक्यता असल्याने चेन्नईचा संघही जेतेपदासहीत धोनीला निरोप देण्याच्या इराद्यानेच मैदानावर उतरेल.