पहिल्या विजयासाठी मुंबई-हैदराबाद मैदानात उतरणार, अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये आज आठवा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने असणार आहेत. दोन्ही संघांना आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे पहिल्या विजयसाठी मुंबई आणि हैदराबाद मैदानात उतरतील.
IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये आज हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्ससमोर (Mumbai Indians) पॅट कमिन्सच्या सनरायजर्स हैदराबादचं (Sunrisers Hyderabad) आव्हान असणार आहे. हैदराबादमधल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. मुंबई आणि हैदराबादला आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. कोलकाता नाईट रायडर्सने सनरायर्स हैदराबादचा पराभव केला होता. तर गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत विजयी सलामी दिली होती. त्यामुळे दोन्ही संघ आज आपल्या पहिल्या विजयासाठी मैदानात उतरतील.
मुंबई इंडियन्सची मदार फलंदाजीवर
मुंबई इंडियन्सची जमेची बाजू म्हणजे त्यांची फलंदाजी. रोहित शर्मा (Rohit Sharma), ईशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, ब्रेव्हिस असे आक्रमक फलंदाज मुंबईच्या ताफ्यात आहेत. पण पहिल्या सामन्यात रोहित शर्मा आणि ब्रेव्हिस वगळता इतर फलंदाजांना समाधानकारक सामगिरी करता आली नव्हती. सलामीला आलेला ईशान किशन तर भोपळाही फोडू शकला नाही. तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहवर मदार असेल. पहिल्या सामन्यात बुमराहने तीन विकेट घेत दमदार सुरुवात केली होती.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), ब्रेव्हिस, तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेविड, शम्स मुलानी, पीयूष चावला, गेराल्ड कोएत्जी, जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराह वि. क्लासेन
सनरायजर्स हैदराबाद संघात क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे ते आक्रमक फलंदाज हेन्रिक क्लासेनवर (Heinrich Klaasen). मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला क्लासेन कसा सामोरं जाणार याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात क्लासेनने अवघ्या 29 चेंडूत 63 धावांची खेळी केली होती. यात त्याने तब्बल 8 षटकार लगावले. क्लासेनच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर हैदराबाद संघ विजयाच्या अगदी नजीक येऊन ठेपला होता. पण अवघ्या चार धावांनी त्यांना पराभव पत्करावा लागला.
क्लासेन शिवाय मयांक अग्रवाल, एडेम मार्कराम, अब्दुल समद यांच्याकडूनही संघाला मोठी अपेक्षा असणार आहे. मुंबईच्या तुलनेत हैदराबाजी गोलंदाजी अधिक भक्कम आहे. स्वत: कर्णधार पॅट कमिंस याच्यासह भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि फिरकी गोलंदाज मयंक मार्केंडे असे मॅचविनर गोलंदाज हैदराबाद संघात आहेत.
सनरायजर्स हैदराबाची प्लेईंग इलेव्हन
मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जानसन, पॅट कमिंस (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन