IPL 2024 : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने (GT) हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) मात केली. या पराभवाबरोबरच मुंबई इंडियन्सने आयपीएलचा पहिला सामना हरण्याची परंपरा कायम ठेवली. तर आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधार म्हणून जबाबदारी स्विकारणाऱ्या शुभमन गिलने दमदार सुरुवात केली. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात करणारा ईशान किशन शुन्यावर बाद झाला. पण त्यानंतरही हा सामना ईशान किशनसाठी (Ishan Kishan) खास ठरला. सामना संपल्यानंतर ईशान किशनसोबत अनपेक्षित घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशान किशनला सरप्राईज
मुंबई आणि गुजरातच्या सामन्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाचे सचिव जय शाह यांनी मुंबईचा फलंदाज-विकेटकिपर ईशान किशनची भेट घेतली. ईशान किशन हा सध्या बीसीसीआयच्या टार्गेटवर आहे. बीसीसीआच्या सेंट्रल कॉन्ट्रॅ्क्टमधूनही ईशान किशनला डच्चू देण्यात आला होता. ईशान किशनवर बीसीसीआय नाराज असल्याचं बोललं जात आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ईशान किशनने वैयक्तिक कारण देत माघार घेतली होती. त्यानंतर रणजी ट्रॉफीमध्येही खेळण्यास त्याने नकार दिला होता. 


ईशान किशनने 2023 च्या डिसेंबरमध्ये मानसिक थकव्याचं कारण देत ईशान किशनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो खेळला नाही. तो खेळत असलेल्या स्थानिक क्रिकेट बोर्ड छत्तीसगड क्रिकेट असोसिएशनलाही त्याने कोणतीही माहिती दिली नाही. रणजी ट्रॉफीतही तो खेळला नाही. या दरम्यान ईशान किशन थेट बडोद्यात हार्दिक पांड्याबरोबर किरण मोरे अकॅडमीत सराव करताना दिसला. बीसीसीआयने हा प्रकार गांभीर्याने घेत टीम इंडियात पुनरागमन करायचं असल्यास स्थानिक क्रिकेट खेळावं लागेल असा इशारा दिला. 


ईशानने केलं दुर्लक्ष
पण बीसीसीआयच्या इशाऱ्याकडे ईशान किशनने सपशेल दुर्लक्ष केलं. यावर त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. यामुळे बीसीसीआय ईशान किशनवर नाराज आहे. पण आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सच्या सामन्यानंतर जय शाह यांनी स्वत: ईशान किशनची भेट घेतली. ईशानच्या खांद्यावर हात टाकत जय शाह यांनी त्यांच्याशी बराचवेळ चर्चा केली.


टीम इंडियात पुनरागमनाचे संकेत
ईशान किशन आणि जय शाह यांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. जय शाहांच्या भेटीनंतर लवकरच ईशान किशनचं नाव बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये दिसणार असा कयास चाहते वर्तवतायत. आयपीएलनंतर जूननंतर होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्येही ईशान किशन टीम इंडियात दिसू शकतो. आता आयपीएलमध्ये तो कशी कामगिरी करतो यावर सर्व अवलंबून आहे.