धोनीने अचानक घेतला कर्णधारपद सोडण्याचा निर्णय? CEO चं विधान चर्चेत, `मला फोटोशूटच्या आधीच...`
IPL 2024: आयपीएलच्या पूर्वसंध्येला चेन्नई सुपरकिंग्जने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडलं असून, ऋतुराज गायकवाड संघाचा नवा कर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे सीईओंनाही या निर्णयाची कल्पना नव्हती.
IPL 2024: क्रिकेटचाहते आतुरतेने आयपीएल स्पर्धा सुरु होण्याची वाट पाहत असतानाच पूर्वसंध्येला चेन्नई सुपरकिंग्जने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडलं असून, ऋतुराज गायकवाड संघाचा नवा कर्णधार असल्याचं चेन्नईने जाहीर केलं आहे. कर्णधारांचं फोटोशूट झालं तेव्हा हे समोर आलं आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. चेन्नईनेही प्रसिद्धीपत्रकातून अधिकृतपणे ही माहिती दिली आहे. अचानक ही घडामोड समोर आल्यानंतर चेन्नईचे चाहते आश्चर्य व्यक्त करु लागले. विशेष म्हणजे सीईओंनाही या निर्णयाची कल्पना नव्हती.
आयपीएलच्या पूर्वसंध्येला सर्व कर्णधार फोटोशूटसाठी एकत्र आले होते. यावेळी चेन्नईचा कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाड हजर असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. काही वेळाने चेन्नई संघानेही धोनीने कर्णधारपद सोडलं असल्याचं जाहीर केलं. दरम्यान चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कर्णधारांच्या फोटोशूटच्या काही क्षण आधी आपल्याला महेंद्रसिंह धोनीच्या निर्णयाची माहिती मिळाली असा दावा त्यांनी केला आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत काशी विश्वनाथन म्हणाले की, "धोनी जे काही करतो, ते संघाच्या हिताचा विचार करुनच करतो. मला कर्णधारांच्या फोटोशूटच्या काही क्षण आधी या निर्णयाची माहिती मिळाली. तुम्ही त्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. हा त्याचा निर्णय आहे".
चेन्नई संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनीही यावर प्रतिक्रिया देताना आम्ही या निर्णयासाठी आधीपासून तयार होतो असं सांगितलं आहे. कर्णधारपदासाठी तरुण खेळाडूंना फ्रँचाइजी तयार करत आहे असंही ते म्हणाले. "आम्ही 2022 मध्ये धोनीला दूर करण्यासाठी तयार नव्हतो. त्याला खेळाची चांगली जाण आहे. पण आम्हाला नव्या खेळाडूंनाही या भूमिकेसाठी तयार करायचं आहे. आम्ही यावेळी पूर्ण तयारीत आहोत," असं त्यांनी सांगितलं आहे.
स्टिफन फ्लेमिंग यांनी यावेळी मागील हंगामाच्या तुलनेत धोनी जास्त तंदरुस्त असल्याने संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असेल असं स्पष्ट केलं आहे.
चेन्नईचं प्रसिद्धीपत्रक
चेन्नईने प्रसिद्धीपत्रक जारी करत ऋतुराज गायकवाड आगामी हंगामात कर्णधार असेल याची अधिकृत माहिती दिली आहे. यात सांगण्यात आलं आहे की, "आगामी आयपीएल 2024 साठी महेंद्रसिंह धोनीने चेन्नईचं कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं आहे. 2019 पासून ऋतुराज चेन्नई संघाचा महत्त्वाचा भाग असून त्याने संघासाठी एकूण 52 सामने खेळले आहेत".