`मी प्रत्येक सामन्यानंतर..`; धोनीने सांगितलं 17 वर्षांपासून IPL मध्ये मिळणाऱ्या यशाचं Secret
MS Dhoni Shares His Secret Behind IPL Sucess: आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा जेतेपद पटकावण्याचा मान ज्या दोन कर्णधारांना मिळाला आहे त्यामध्ये धोनीचाही समावेश असून असा पराक्रम करणारा दुसरा कर्णधार म्हणजे रोहित शर्मा!
MS Dhoni Shares His Secret Behind IPL Sucess: इंडियन प्रिमिअर लीगचं सध्या 17 वं पर्व सुरु आहे. या पर्वातील अर्धाहून अधिक मॅच संपल्या आहेत. यंदाची स्पर्धा ही चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीची शेवटची आयपीएल स्पर्धा असेल अशी जोरदार चर्चा आहे. 42 वर्षांच्या धोनीच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत चेन्नईच्या संघाने 5 वेळा जेतेपदावर नाव कोरलं. यंदा मात्र संघाचं नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आलं आहे. मात्र धोनीचा मैदानावरील वावर आणि त्याला काही क्षण फलंदाजी करताना पाहण्यासाठी आजही हजारो चाहते मैदानात प्रत्यक्ष हजेरी लावत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीकडे पाहिलं जातं. मात्र धोनीच्या या यशामागील नेमकं गुपीत काय आहे? यासंदर्भात धोनीनेच खुलासा केला आहे.
काय म्हणाला धोनी?
'स्टार स्पोर्ट्स'ने त्यांच्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) हॅण्डलवरुन केलेल्या पोस्टमध्ये, धोनीने आयपीएलमधील आपल्या आतापर्यंतच्या यशाचं श्रेय झोपेच्या वेळापत्रकाला दिलं आहे. धोनीचं हे झोपेचं वेळापत्रक फारच विचित्र असल्याचं अनेकांचं मत आहे. मात्र याच वेळापत्रकामुळे आपल्याला फ्रेश राहण्यास मदत मिळते असं धोनीने म्हटलं आहे. हा व्हिडीओ काही वर्षांपूर्वीचा असून यामध्ये तरुण वयातील धोनी, "काहीजणांच्या मते हे फार विचित्र वेळापत्रक आहे. मात्र मागील काही वर्षांमध्ये या वेळापत्रकाचा मला फायदाच झाला आहे. आयपीएल सुरु होण्याच्या 5 ते 7 दिवसांपूर्वी, मी त्या पद्धतीने विचार करायला सुरुवात करतो की सामने सुरु झाले आहेत आणि मी माझ्या मनाला तशापद्धतीने ट्रेन करायला सुरुवात करतो. यामध्ये हातभार लावणारी गोष्ट म्हणजे आम्ही मध्यरात्री 12 नंतरचं विमान पकडायचो," असं सांगताना दिसतो.
धोनीने सांगितलेलं ते सिक्रेट काय?
"मी काय करतो तर आयपीएलच्या काळात प्रत्येक सामन्यानंतर फार उशीरा झोपायचो. कारण सामन्यांचा वेळ हा रात्री 8 ते 11-11.30 असा असायचा. त्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन असायचं. मग आपलं सामना पॅक करुन बॅगा घेऊन मैदानातून निघायचं. मग जेवायला उशीर व्हायचा. तुम्ही सारं करुन हॉटेलवर परत जाईपर्यंत जवळपास 1 ते सव्वा वाजलेला असतो. त्यानंतर तुम्हाला तुमच्या रुमवरील सामान पॅक करावं लागतं. मग तुमचं किट पॅक करुन ते तयार करुन ठेवणं वगैरे यासाठी जवळपास 2.30 वाजतात," असं धोनी त्याचं वेळापत्रकाबद्दल माहिती देताना सांगतो.
नक्की पाहा >> अशी बॅटिंग कधी पाहिलीच नसेल... हे फक्त पाकिस्तानात घडू शकतं; 'हा' Video पाहा
पुढे बोलताना धोनी सामान्य लोकांच्या वेळापत्रकापेक्षा आपल्या झोपेचे वेळापत्रक वेगळं असल्याचं सांगतो. सामान्यपणे लोक 10 ते 6 किंवा 11 ते 7 या वेळेत झोपतात. मात्र आयपीएलमधील सामन्यांमुळे धोनीचं आयपीएलच्या काळातील वेळापत्रक रात्री 3 ते सकाळी 11 असं असल्याचं त्याने स्वत: सांगितलं.
नक्की पाहा >> SRK च्या KKR विरुद्ध पंजाबच्या विक्रमानंतर सलमानची पोस्ट Viral! रात्री दीडला रिप्लाय
..म्हणून मला कधीच थकल्यासारखं वाटत नाही
"त्यामुळे आयपीएलच्या काळात रात्री 10 ते सकाळी 6 किंवा रात्री 11 ते सकाळी 7 अशावेळेत झोपण्याऐवजी मी रात्री 3 ते सकाळी 11 या वेळात झोपायचो. त्यामुळे मला लागणारी किमान 8 तासांची झोप मी या वेळात पूर्ण करुन घेतो. मला रात्री व्यवस्थित आराम मिळतो. त्यामुळेच सामना संपल्यानंतर मला कधीच दमल्यासारखं किंवा थकल्यासारखं वाटतं नाही," असं धोनीने व्हिडीओत सांगितलं.
यंदाच्या पर्वातही धोनी शेवटच्या काही षटकांमध्ये फलंदाजीसाठी येऊन मोठे फटके मारताना आणि स्टम्पमागे चपळपणे क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे.