Pat Cummins Withdraws Appeal vs Ravindra Jadeja: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाददरम्यानचा इंडियन प्रिमिअर लीगमधील 17 वा सामना हैदराबादने 6 विकेट्सने जिंकला. या सामन्यात चेन्नईची ना बॅटिंग उत्तम झाली ना बॉलिंग! चेन्नईच्या फलंदाजांना सनरायझर्सच्या गोलंदाजांविरुद्ध धावा काढताना बरीच अडचण येत असल्याचं दिसून आलं. विशेष करुन शेवटच्या काही षटकांमध्ये चेन्नईची फलंदाजी फारच निराशाजनक राहिली. चेन्नईच्या संघाला कसाबसा 160 चा टप्पा ओलांडून 165 धावांपर्यंत मजल मारता आली. 


चेन्नईची सुमार खेळी अन् जडेजाबरोबरचा गोंधळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईकडून सध्या तुफान फलंदाजी करणारा शिवम दुबे हाच संघाकडून सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू ठरला. त्याने 24 बॉलमध्ये 45 धावा केल्या तर अजिंक्य रहाणेनेही 30 बॉलमध्ये 35 धावा करत त्याला साथ दिली. या दोघांनी मिळून 6.3 ओव्हरमध्ये केलेली 65 धावांची पार्टनरशीप एवढीच काय ती चेन्नईच्या फलंदाजीमधील जमेची बाजू ठरली. चेन्नईच्या संघाला शेवटच्या पाच ओव्हरमध्ये केवळ 37 धावा करता आल्याने त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. फलंदाजांना धावा काढणं कठीण जात होतं. मात्र असं असतानाही डावाच्या शेवटाकडे चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा मैदानात टिकून राहिला आणि त्याने 23 बॉलमध्ये 31 धावा केल्या. सामन्यातील 19 व्या ओव्हरमध्ये जडेजाबरोबर घडलेला एक प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरतोय.


नेमकं मैदानात घडलं काय?


झालं असं की, 19 व्या ओव्हरला भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर पुढे येऊन मोठा फटका मारण्याचा जडेजाचा प्रयत्न होता. मात्र बॉल बॅटला लागून पुन्हा भुवनेश्वरकडे गेला. बॉल कुठे आहे हे न समजल्याने जडेजा चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात होता. तितक्यात समोरुन भुवनेश्वरने बॉल उचून जडेजाला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र जडेजाने मागे फिरताना पीच ओलांडून डावीकडून उजवीकडे तिरकी धाव घेत भुवनेश्वरचा स्टम्पचा व्ह्यू अडवला आणि भुवनेश्वरने फेकलेला बॉल जडेजाला लागला. आता हे असं जडेजाने मुद्दाम केलं की केवळ धावबाद होऊ नये म्हणून त्याच्याकडून नकळत हे झालं यावरुन वाद सुरु आहे.


नक्की वाचा >> 29 बॉलमध्ये 61 धावा करुन सामना जिंकवणाऱ्या 'शशांक सिंह'मुळे प्रीती झिंटाला झालेला पश्चाताप, पण...


अशाप्रकारे जडेजाला फिल्डींगमध्ये अडथळा आणला म्हणून बाद देण्यासंदर्भात पंच चर्चा करु लागले. मोठ्या स्क्रीनवर रिव्ह्यूही सुरु झाला. पण अचानक हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने जडेजाला बाद ठरवण्यासाठी केलेली अपिल मागे घेतली. रिव्ह्यू मध्येच सोडून देत सामना पुढे सुरु करण्यात आला. 



योग्य की अयोग्य?


आता कमिन्सने हे असं का केलं याबद्दल चर्चा सुरु आहे. अनेकांनी धोनीला मैदानात येऊ न देण्याचा कमिन्सचा प्लॅन होता. तसेच जडेजाला मनासारखी फटकेबाजी करता येत नव्हती. त्यामुळे त्याला खेळवत राहण्याच्या दृष्टीने कमिन्सने हा डाव खेळला असंही बोललं जात आहे.



अनेकांनी कमिन्सने जे केलं त्याचं कौतुक केलं आहे. तर काहींना मात्र त्याचं वागणं खटकलं आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करुन नक्की कळवा.