IPL 2024: गौतम गंभीरने `Greatest Team Man` म्हणून `या` खेळाडूचं घेतलं नाव; तो धोनी किंवा सचिन नाही
IPL 2024: गौतम गंभीर पुन्हा एकदा केकेआर संघात दाखल झाला असून, मेंटॉरची भूमिका निभावताना दिसणार आहे. दरम्यान नुकतंच एका कार्यक्रमात त्याने आपल्या भावना व्यक्त करताना त्याला वाटलेला सर्वोत्तम सांघिक खेळाडू कोण आहे याचा खुलासा केला.
IPL 2024: आयपीएलमध्ये गौतम गंभीर पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्स संघात दिसणार आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वात केकेआरने आतापर्यंत दोन वेळा विजेतेपद पटाकवलं आहे. दरम्यान आता गौतम गंभीर माजी कर्णधार असून, केकेआरच्या मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार आहे. गौतम गंभीर परतल्याने केकेआर संघ पुन्हा एकदा आपली कमाल दाखवेल असा विश्वास संघ व्यवस्थापन व्यक्त करत आहे. गौतम गंभीर नेहमीच वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाला जास्त महत्व देतो. नुकतंच एका कार्यक्रमात गौतम गंभीरने केकेआरचा माजी खेळाडू रयान डेन डोशेट हा आतापर्यंतचा सर्वात महान सांघिक खेळाडू असल्याचं म्हटलं आहे.
गौतम गंभीर आपल्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट खेळाडूंसह खेळला आहे. मग तो एमएस धोनी असो, सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली. पण, त्याच्या मते नेदरलँडचा माजी फलंदाज सर्वोत्कष्ट सांघिक खेळाडू होता.
“जेव्हा मी निःस्वार्थतेबद्दल बोलतो, तेव्हा मी माझ्या 42 वर्षांच्या कारकिर्दीत हे कधीही बोलले नाही आणि मला हे सांगायचे होते. मी आजवर खेळलेला महान खेळाजू, सर्वात नि:स्वार्थी माणूस, ज्याच्यासाठी मी अंगावर गोळी घेऊ शकतो, ज्याच्यावर मी आयुष्यभर विश्वास ठेवू शकतो, आणि मी तुम्हाला हे सांगू शकतो कारण 2011 मध्ये KKR कर्णधार म्हणून माझा पहिला सामना होता," असं गौतम गंभीर म्हणाला.
"आम्हाला फक्त 4 परदेशी खेळाडूंना खेळवण्याची परवानगी होती. आणि या खेळाडूने 50 ओव्हर्सच्या वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. आम्ही फक्त 3 परदेशी खेळाडूंसह खेळलो. तो खेळाडू मैदानात ड्रिंक्स घेऊन येत होता. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर नाराजीची कोणतीही भावना नव्हती. त्याने मला निस्वार्थपणा शिकवला. तो खेळाडू म्हणजे रयान डेन डोशेट. हेच लोक आहेत ज्यांनी मला लीडर बनवलं," असा खुलासा गौतम गंभीरने केला.
"मी तुम्हाला खात्री देतो की, जेव्हा मी हा जागा (केकेआर) सोडून जाईन तेव्हा संघ आहे त्यापेक्षा चांगल्या स्थितीत असेल," असं गौतम गंभीरने म्हटलं आहे. "मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. मी केकेआरला यशस्वी बनवलं नाही. केकेआरने मला यशस्वी बनवलं. केकेआरने मला लीडर बनवलं," अशा भावना गौतम गंभीरने व्यक्त केल्या आहेत. पुढे त्याने म्हटलं आहे की, "मला हाताळणं फार कठीण आहे. मला शाहरुख खान आणि संघाचा व्यवस्थापकीय संचालक वेंकी यांचे आभार मानायचे आहेत. अनेक वर्ष त्यांनी माझी नाटकी सहन केली".