`तो फारच स्पेशल, कारण..`; आधी टीममध्ये घेऊन पश्चाताप, आता सेल्फीसहीत प्रितीची भावनिक पोस्ट
IPL 2024 Preity Zinta Emotional Post Selfie With Shashank Singh: पंजाबचा संघ पराभूत होणार असं वाटत असतानाच मधल्या फळीतील या घरगुती स्पर्धांमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूने सामाना जिंकून दिल्यानंतर आयपीएल लिलावातील गोंधळावरुन प्रिती झिंटाला ट्रोल करण्यात आलं.
IPL 2024 Preity Zinta Emotional Post Selfie With Shashank Singh: इंडियन प्रिमीअर लीग च्या 17 व्या सामन्यामध्ये पंजाब किंग्स इलेव्हनने अगदी रोमहर्षक सामन्यामध्ये गुजरात टायटन्सचा पराभव केला. हा सामना अगदी शेवटून दुसऱ्या बॉलपर्यंत रंगला. उत्तरोत्तर उत्कंठा वाढत गेलेला हा सामना पाहण्यासाठी पंजाबच्या संघाची सहमालकीण असलेली अभिनेत्री प्रिती झिंटाही उपस्थित होती. 200 पाठलाग करताना पंजाबचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. मात्र घरगुती क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळणारा मधल्या फळीतील फलंदाज शशांक सिंहने संघाला सामना जिंकून दिला. शशांकने 29 बॉलमध्ये नाबाद 61 धावा करत संघाचा विजय सुनिश्चित केला. 6 चौकार आणि 4 षटकारांची आतिशबाजी करत अगदी नाबाद राहून शशांकने आपल्या संघासाठी कामगिरी फत्ते केली. मात्र या सामन्यानंतर प्रिती झिंटा आणि आयपीएलच्या लिलावादरम्यान शशांकवरुन झालेला गोंधळ सोशल मीडियावर चर्चेत आला. यानंतर प्रिती झिंटाने स्वत: शशांकबरोबर सामना संपल्यानंतरचा सेल्फी फोटोसहीत भावनिक पोस्ट केली आहे.
सामन्यानंतर प्रिती झाली ट्रोल
गुरुवारी अहमदाबादच्या मैदानामध्ये पंजाबाला विजय मिळवून देणाऱ्या शशांकला आयपीएलच्या लिलावामध्ये विकत घेतल्यानंतर संघाला पश्चाताप झालेला असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. याच पश्चातापाची आठवण अनेकांना पंजाबने गुजरातवर विजय मिळवल्यानंतर झाली. अनेकांनी नशिबाने संघात आलेल्या खेळाडूने प्रिती झिंटाच्या टीमचा रोमहर्षक विजय मिळवून दिल्याची सोशल मीडियावर चर्चा होती. अनेकांनी यावरुन प्रितीला ट्रोलही केलं. आयपीएल 2024 च्या लिलावादरम्यान पंजाब किंग्स इलेव्हनची सहमालकीण असलेली अभिनेत्री प्रिती झिंटा आणि नेस वाडिया गोंधळून गेले. त्यांनी अनकॅप खेळाडू असलेल्या शशांक सिंहवर बोली लावली आणि ती जिंकली. मात्र नंतर संघाला आपल्याला हा खेळाडू विकत घ्यायचा नव्हता असं लक्षात आलं. पण तोपर्यंत लिलाव पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आलेली आणि पुढच्या खेळाडूचा लिलाव सुरु झालेला. आयपीएल 2024 च्या लिलावकर्त्या मलिका सागर यांना सुद्धा पंजाबच्या संघााने केलेल्या या खरेदीचं आश्चर्य वाटलं. दुसरीकडे पंजाबच्या डेस्कवर सर्व मालक खेळाडूंची यादी पटापट तपासून पाहत काहीतरी गोंधळ झाल्याचं दर्शवत होते. मात्र पंजाबला त्यावेळेस पश्चाताप झाला तरी त्यांनी या शशांकला संघात घेतल्याची घोषणा सोशल मीडियावरुन केली होती. नाव सारखं असल्याने हा गोंधळ झाल्याचं संघाने म्हटलं होतं.
पंजाबने दिलेलं स्पष्टीकरण
या गोंधळानंतर संघाने शशांकला विकत घेतल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली. "पंजाब किंग्सच्या संघाला हे स्पष्ट करायचं आहे की शशांक सिंह हा कायमच आमच्या टार्गेट लिस्टवर होता. लिलाव होणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये एकाच नावाचे दोन खेळाडू असल्याने गोंधळ झाला. मात्र आम्ही योग्य शशांकची निवड केली आहे आणि तो आमच्या संघात असल्याचा आम्हाला आनंद आहे. तो आमच्या यशात नक्कीच योगदान देईल," असा विश्वासं संघ व्यवस्थापनाने एक्स (पूर्वीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन व्यक्त केला होता.
प्रितीने पोस्ट केला शशांकसोबतचा सेल्फी; भावनिक कॅप्शन चर्चेत
सोशल मीडियावरील चर्चा, ट्रोलिंग आणि विजयाच्या पार्श्वभूमीवर प्रितीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शशांकबरोबरचा मैदानातील सेल्फी पोस्ट केला आहे. या फोटोला दिलेली कॅप्शन सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये प्रितीने, "यापूर्वी बोलल्या गेलेल्या गोष्टी आणि लिलावादरम्यान आमच्याकडून जो गोंधळ झाला त्याबद्दल बोलण्यासाठी आजचा दिवस अगदी उत्तम आहे. आपल्यापैकी अनेकजण असा परिस्थितीमध्ये आत्मविश्वास गमावतात, दबावाला बळी पडतात किंवा निरुत्साही होतात. मात्र शशांक त्यांच्यापैकी नाही. तो इतर अनेकांपैकी नक्कीच नाही. तो फार खास आहे. केवळ त्याच्याकडे असलेल्या कौशल्यामुळे तो खास आहे असं नाहीये. तर त्याच्याकडे असलेला सकारात्मक दृष्टीकोन आणि अविश्वनिय स्पिरीटमुळे तो खास आहे. त्याने त्याच्याबद्दल झालेली सर्व वक्तव्य, विनोद आणि टिका अगदी स्पोर्टींगली स्वीकारली आणि कधीच आपण परिस्थितीला बळी पडल्यासारख्या म्हणजेच व्हिक्टीम असल्यासारखा वागला नाही. त्याचा स्वत:वर विश्वास होता आणि त्याने त्याने आपल्याला दाखवून दिलं की तो किती कणखर आहे. यासाठीच मी त्याचं फार कौतुक करते. मी त्याची यासाठी प्रशंशा करते आणि मला त्याच्याबद्दल फार आदर वाटतो. जेव्हा तुमचं आयुष्य वेगळ्या वळणावर जाईल आणि तुमच्या स्पिरीटप्रमाणे काही घटत नसेल तेव्हा तो तुमच्यासाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्व ठरेल अशी मला अपेक्षा आहे. तुमच्याबद्दल लोक काय विचार करता हे महत्त्वाचं नाही तर तुम्ही स्वत:बद्दल काय विचार करता हे महत्त्वाचं असल्याचं शशांककडे पाहिल्यावर समजतं. त्यामुळे कधीच स्वत:वर शंका घेऊ नका. स्वत:वर विश्वास ठेवा अगदी शशांक ठेवतो तसा आणि असं केल्यास मला विश्वास आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याचे मॅन ऑफ द मॅच ठराल," असं म्हटलं आहे.
20 लाखात झाली खरेदी
शशांकला पंजाबच्या संघाने 20 लाखांच्या बेस प्राइजला संघात घेतलं. शशांकचं नाव लिलावादरम्यान जाहीर झालं तेव्हा प्रिती झिंटाने खरेदीसाठी इच्छा असल्याचं निशाण दाखवलं. चर्चा केल्यानंतरच प्रितीने ही कृती केली होती. मात्र या शशांकला संघात घेण्यासाठी इतर कोणत्याही संघाने बोली न लावल्याने त्याला लगेच लिलाव झाला होता.
शशांकची कामगिरी कशी?
शशांक सिंहने 58 घरगुती टी-20 सामने खेळले असून त्यात 754 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 137.34 इतका आहे. तो छत्तीसगडच्या संघामधील बॅटींग ऑलराऊण्डर आहे. यापूर्वी शशांकला सनरायझर्स हैदराबा, दिल्ली डेअरडेव्हल्स, राजस्थान रॉयल्सच्या संघाने विकत घेतलं होतं.