हार्दिकच्या Exit नंतर GT समोरील आव्हानं कोणती? सर्वाधिक चिंता `या` गोष्टीची! फायनलची Hat-Trick की..
Gujarat Titans SWOT Analysis: गुजरातच्या संघासाठी यंदाचं आयपीएल हे प्रायोगांचं असणार असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. मागील दोन्ही पर्वांमध्ये अगदी फायनलपर्यंत गेलेला आणि एकदा थेट जेतेपद जिंकणारा संघ यंदा कसा आहे? त्याच्या जमेच्या आणि लंगड्या बाजू कोणत्या आहेत पाहूयात...
इंडियन प्रिमिअर लीगचं यंदाचं म्हणजेच 2024 चं पर्व सर्वाधिक प्रयोग होण्याची शक्यता असलेला संघ म्हणजे गुजरात टायटन्स! आयपीएलमध्ये मागील अवघ्या 2 वर्षांपासून खेळणाऱ्या या संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याच संघला सोडून मुंबई इंडियन्सच्या संघात गेल्याने गुजरातच्या संघासमोर यंदा नवी आव्हानं असतील यात शंका नाही. बोटीचा कॅप्टनच बोट सोडून गेल्याने आता शुभमन गिलच्या हाती गुजरात टायन्सच्या बोटीला दिशा दाखवण्याचं काम सोपवण्यात आलं आहे. तसा शुभमन गिल हा सुद्धा मागील पर्वातील ऑरेंज कॅप होल्डर खेळाडू आहे. मागील पर्वात शुभमनने 870 धावा कुटल्या होत्या आणि त्याही अवघ्या 17 सामन्यांमध्ये. असं असलं तरी शुभमनकडे नेतृत्व करण्याचा तितकासा अनुभव नसणं संघाच्या कामगिरीवर परिणाम करणारं ठरु शकतं. या संघाची ताकद काय आहे, कमतरता काय आहे पाहूयात...
आतापर्यंतची कामगिरी कशी?
गुजरात टायटन्सचा संघ 2022 आणि 2023 चं आयपीएलचं पर्व खेळला आहे. यापैकी आपल्या पदार्पणाच्या पर्वात गुजरातने थेट जेतेपदावर नाव कोरत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मागील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये गुजरातच्या संघाने अंतिम सामन्यात धडक मारली पण तिथे त्यांचा चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने पराभव करत पाचव्यांदा चषकावर नाव कोरलं. या संघाने आपल्या पहिल्या 2 पर्वांमध्ये एकूण 33 सामने खेळले असून त्यापैकी केवळ 10 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. म्हणजेच 33 पैकी 23 सामने गुजरातने जिंकले आहे.
आव्हानं
यंदाच्या पर्वात कर्णधार बदलण्याबरोबरच गुजरासमोरील सर्वात मोठं आव्हान गोलंदाजीचं असणार आहे. मागील पर्वात पर्पल कॅप म्हणजेच सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान पटकावणारा मोहम्मद शमी यांच्या पर्वात दुखापतीमुळे खेळणार नाही. त्यामुळेच आता पॉवर प्लेमध्ये विकेट्स घेण्याची जबाबदारी उमेश यादववर असणार आहे. पंड्याच्या अनुपस्थितीमध्ये संघात आपलं स्थान अधिक भक्कम करण्याची संधी आर. साई किशोरकडे आहे. यंदाच्या पर्वातून रॉबिन मिन्झनेही माघार घेतली आहे.
संघाकडे विकेटकीपर बॅट्समनचा दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळेच नवीन प्रयोगाऐवजी मागील वर्षाप्रमाणे यंदाही संपूर्ण जबाबदारी वृद्धीमान साहावर असेल. गुजरातच्या संघाची फलंदाजी दमदार असली तरी शमी आणि हार्दिकच्या अनुपस्थितीमुळे गोलंदाजी तितक्या तोडीची आहे असं सध्या तरी संघाकडे पाहिल्यास म्हणता येणार नाही. गोलंदाजी हा गुजरातच्या संघासाठी यंदाच्या पर्वातील लंगडी बाजू ठरु शकणारी फॅक्टर आहे.
जमेची बाजू
कर्णधार आणि एक ते 2 महत्त्वाचे खेळाडू वगळल्यास उर्वरित संघ आहे तसाच आहे. त्यामुळेच मागील 2 पर्वात केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती संघाला नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली करावी लागणार आहे. याशिवाय संघात नुकत्याने सहभागी झालेला शाहरुख खान, अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतिया, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे.
संधी
संघाचा कर्णधारच बदलल्याने संघाचा सामन्यांकडे आणि स्पर्धेकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारच वेगळा असेल यात शंका नाही. तसेच मागील 2 वर्षांपासूनच्या दमदार कामगिरीमध्ये संघाचा आत्मविश्वास हा इतर संघाच्या तुलनेत अधिक असेल यात शंका नाही. या साकारात्मक दृष्टीकोनाचा योग्य वापर केल्यास संघाला त्याचा नक्कीच फायदा होईल.
धोका
कर्णधार हार्दिकने अचानक संघातून एक्झिट घेतली आहे. मात्र आता संघ पुन्हा आधीसारखा बांधून ठेवणं आणि त्यांच्याकडून विजेत्यासारखी कामगिरी करुन घेण्याचं आव्हान शुभमन गिलला स्वीकारावं लागणार आहे. बरं हे करताना शुभमनला स्वत:च्या फलंदाजीवरही लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. शुभमनची तारेवरची कसरत होणार आहे हे मात्र नक्की. ही कसरत करताना त्याचा विपरित परिणाम शुभमनच्या कामगिरीवर किंवा संघाच्या कामगिरीवर झालेलं संघाला महागात पडू शकतं.
संभाव्य प्लेइंग 11
शुभमन गिल (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), बी. साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, विजय शंकर, शाहरुख खान, राशिद खान, स्पेन्सर जॉन्सन, मोहित शर्मा, उमेश यादव,
संभाव्य प्लेइंग 11 वगळता गुजरातच्या संघात असलेले अन्य पर्यायी खेळाडू कोण?
मॅथ्यू वेड, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, दर्शन नळकांडे, जयंत यादव, नूर अहमद, साई किशोर, जोशुआ लिटल, अजमतुल्ला ओमरझाई, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार,
आता या साऱ्या बेरीज-वजाबाकीनंतर शुभमनच्या नेतृत्वाखालील गुजरातचा संघ खरोखरच तिसऱ्यांदा अंतिम सामन्यापर्यंत मजल मारण्याचा पराक्रम करु शकतो का हे येणारा काळच सांगेल.