गौतम गंभीर-विराटने गळाभेट का घेतली? वरिष्ठ खेळाडूने केला खुलासा `उगाच सीमा ओलांडून....`
IPL 2024: विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. मागील हंगामात नवीन-उल हकमुळे दोघांमध्ये मोठा वाद झाला होता.
IPL 2024: आयपीएलमध्ये शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने-सामने आले होते. या सामन्यात सर्वांचं लक्ष गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्याकडे होतं. याचं कारण मागील हंगामात दोघांमध्ये फार मोठा वाद झाला होता. दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. पण या हंगामात मात्र दोघेजण एकमेकांची गळाभेट घेताना दिसले आणि चाहत्यांना अनपेक्षित धक्का बसला. स्टॅटेजिक टाइम आऊट झालेला असताना दोघेजण आमने-सामने आले आणि हात मिळवला. दोघांनी एकमेकांना मिठीही मारली.
मागील हंगामात गौतम गंभीर लखनऊ सुपरजायंट्स संघात होता. बंगळुरुविरोधातील सामन्यात विराट कोहली आणि नवीन उल-हक मैदानावर भिडले होते. सामना संपल्यानंतर हा वाद आणखीनच वाढला होता. याचं कारण गौतम गंभीर या वादात पडला आणि थेट विराटच्या दिशेने गेला होता. दोघांमध्ये टोकाची शाब्दिक चकमक झाली होती.
दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर इरफान पठाणने गौतम गंभीर आणि विराट कोहलीच्या गळाभेटीवर भाष्य केलं आहे. "गौतम गंभीर ज्येष्ठ खेळाडू आहे. तो खरंतर पुढे आला होता. कधीतरी तुम्ही लक्ष्मणरेषा ओलांडता. पण जेव्हा त्या गोष्टी भूतकाळ होतात, तेव्हा भविष्यात तुमची कधीतरी भेट होते. तुम्ही भविष्यात भेटता तेव्हा ती भेट प्रेमाने होते," असं इरफान पठाणने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना म्हटलं.
दरम्यान सामन्याबद्दल बोलायचं गेल्यास कोलकाताने 7 गडी राखून अत्यंत सहजपणे विजय मिळवला. कोलकाताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 183 धावसंख्या उभारली होती. विराट कोहलीने 83 धावांची नाबाद खेळी केली. कर्णधार फाफ डुप्लेसिस फ्क 8 धावा करु शकला. कॅमेरून ग्रीनने विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 65 रन्सची भागीदारी केली. दिनेश कार्तिकने कोहलीसोबत सहाव्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली. केकेआरकडून हर्षित राणा आणि आंद्रे रसेलने २-२ विकेट्स घेतले. तर सुनील नरीनला 1 विकेट मिळाली.
सुनील नरीन आणि फिल सॉल्टने कोलकाताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी 39 बॉल्समध्ये 86 धावांची भागीदारी केली. नरेनने 22 चेंडूंमध्ये 5 षटकार आणि 2 चौकारांसह 47 धावा केल्या. तर सॉल्टने 20 चेंडूंमध्ये 30 धावा केल्या. सॉल्ट-नरेननंतर व्यंकटेश अय्यरने तुफानी खेळी केली. व्यंकटेश अय्यरने झंझावाती अर्धशतक झळकावत बंगळुरुला पराभवाच्या दिशेने नेलं. व्यंकटेश अय्यरने 30 चेंडूंमध्ये तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या.