IPL 2024 MI vs LSG : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या 48 व्या सामन्यात केएल राहुलच्या (KL Rahul) लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) मुंबई इंडियन्सचा (MI) चार विकेटने पराभव केला. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफमध्ये (Play Off) जाण्याच्या प्रयत्नांना मजबूत धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सला आतापर्यंत खेळलेल्या दहा सामन्यांपैकी फक्त तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर सात सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलंय. आधीच पराभवाचा धक्का बसलेल्या मुंबई इंडियन्सवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बीसीसीआयने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) 24 लाखांचा दंड ठोठावला आहे. याबरोबरच इम्पॅक्ट खेळाडूंसह संपूर्ण संघावर कारवाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने का केली कारवाई?
मुबंई इंडियन्सनचा कर्णधार हार्दिक पांड्यावर लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध स्लो ओव्हर रेटच्या कारणाने आर्थिक दंड लावला आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेट केला आहे. यामुळे संघातील इम्पॅक्ट खेळाडूंसह इतर खेळाडूंनाही प्रत्येकी सहा लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. यासंदर्भात आयपीएल व्यवस्थापानाने एक प्रतिक्रिया दिली असून यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावर आयपीएलच्या 48 व्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामातला स्लो ओव्हर रेटचा हा दुसरा अपराध आहे. त्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्यावर 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याचंही आयपीएल व्यवस्थापनाने सांगितलंय.


मुंबई इंडियन्सचा पराभव
आयपीएलच्या 48 सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. पहिली फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने 7 विकेट गमावत 144 धावा केल्या. मुंबईची टॉप ऑर्डर या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरली. ईशान किशनने 32 तर वढेराने 46 धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईने किमान 144 धावांचा टप्पा गाठला. विजयासाठी 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊने 4 चेंडू बाकी असताना विजय मिळवला. मार्कस स्टॉयनिस लखनऊच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने 62 धावांची खेळी करत संघाला शानदार विजय मिळवून दिला.


मुंबई प्ले ऑफ गाठणार?
दहा पैकी सात सामन्यातील पराभवामुळे मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग आणखी अवघड झाला आहे. मुंबई इंडियन्सला केवळ तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यामुळे मुंबईच्या खात्यात 6 पॉईंट जमा आहेत आणि पॉईंटटेबलमध्ये मुंबई नवव्या स्थानावर आहे. आता मुंबईला प्ले ऑफ गाठायचं असेल तर उर्वरीत सर्व चार सामने जिंकावे लागणार आहेत. चारही सामने जिंकल्यास मुंबईच्या खात्यात 14 पॉईंट जमा होतील. पण 2022 आणि 2023 मध्ये 14 पॉईंट असलेला संघ प्लेऑफमध्ये क्वालीफायन करु शकलेला नाही.