`मला तर IPL म्हणजे क्रिकेट आहे का हा असा प्रश्न पडतो?,` आर अश्विनने मांडलं परखड मत, `नुसत्या जाहिराती...`
IPL 2024 R Ashwin: आयपीएल स्पर्धा इतकी मोठी झाली आहे की, क्रिकेट मागे पडत असून खेळाडूंना सराव आणि जाहिरातींचं शूट यामधून वेळ काढताना फार कष्ट करावे लागत आहेत असं आर अश्विनने म्हटलं आहे.
IPL 2024 R Ashwin: आयपीएल स्पर्धा इतकी मोठी झाली आहे की, क्रिकेट मागे पडत असून खेळाडूंना सराव आणि जाहिरातींचं शूट यामधून वेळ काढताना फार कष्ट करावे लागत आहेत असं स्पष्ट मत भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने मांडलं आहे. 2008 मध्ये आयपीएल स्पर्धेची सुरुवात झाल्यानंतर त्याला मिळालेलं भव्य स्वरुप आणि आगामी काळात दोन महिन्यांची ही दीर्घ स्पर्धा खेळाडूंसाठी फार कठीण ठरु शकते असंही त्याने म्हटलं आहे. "नवखा खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये आलो तेव्हा मी मोठ्या खेळाडूंकडून काहीतरी शिकण्याची अपेक्षा ठेवली होती. 10 वर्षानंतर आयपीएल स्पर्धा कशी असेल याचा विचार मी केला नव्हता. पण आता आयपीएल स्पर्धेत इतकी वर्ष खेळल्यानंतर ती फार मोठी आहे," असं आर अश्विनने पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे.
"कधीकधी तर मला आयपीएल क्रिकेट आहे का? असाही प्रश्न मांडतो. कारण यामध्ये क्रिकेट फार मागे पडत आहे. आयपीएल स्पर्धा फार मोठी आहे. आम्ही जाहिरातींचं शूट करण्यातच फार व्यग्र असतो आणि दिवस संपतो. आयपीएल स्पर्धा आता इथपर्यंत पोहोचली आहे," अशी खंत आर अश्विनने व्यक्त केली आहे.
37 वर्षीय आर अश्विनने अलीकडेच 500 विकेट पूर्ण केले आहेत. त्याने आयपीएल कारकीर्दीची सुरुवात चेन्नई सुपर किंग्जमधून केली होती. आयपीएलमधील कामगिरीमुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळालं होतं. 2022 मध्ये, आयपीएलचे मीडिया हक्क पाच वर्षांसाठी तब्बल 48,390 कोटींमध्ये विकले गेले होते. यासह इंग्लिश प्रीमियर लीगला मागे टाकत ही दुसरी सर्वात मोठी लीग ठरली होती.
अश्विनने आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामातील आठवणीही सांगितल्या. "आयपीएलच्या वाढीची कल्पना कोणीही केली नव्हती. चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळताना स्कॉट स्टायरिसशी झालेलं संभाषण मला अजूनही आठवतो. आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात तो डेक्कन चार्जर्सकडून खेळत होता. त्याने मला आयपीएल स्पर्धा दोन-तीन वर्षांपेक्षा जास्त काळ चालेल असं वाटत नाही असं म्हटलं होतं," अशी माहिती आर अश्विनने दिली.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ॲडम गिलख्रिस्ट यांनी आयोजित केलेल्या पॉडकास्टवर अश्विनने सुरुवातीला पैशांचा मोठा ओघ होता असं सांगितलं. "गेल्या काही वर्षांमध्ये आयपीएल लिलावात जिंकली जाणारी स्पर्धा आहे असं वाटण्याची शक्यता आहे. पण मला विश्वास आहे की लिलाव हा या लीगचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे, परंतु आयपीएलची महत्त्वाची बाब म्हणजे चांगले संघ असणाऱ्या फ्रँचायझी जिंकल्या आहेत," असं आर अश्विन म्हणाला.