आयपीएलचा बेस्ट फिनिशर, मुंबईला घरात घुसून हरवलं... आता टी20 वर्ल्ड कपमध्ये जागा पक्की?
IPL 2024 : आयपीएल 2024 नंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जूनमध्ये टी20 वर्ल्ड कप सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडू्ंची नावं बीसीसीआयला या महिन्याअखेरीस ठरवायची आहेत. अशात टीम इंडियात आयपीएलमधल्या स्टार खेळाडूची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
IPL 2024 : आयपीएल 2024 च्या चौदाव्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) आणि राजस्थान रॉयल्स (RR) आमने सामने होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबईला त्यांच्या होम ग्राऊंडवर हरवण्याचा पराक्रम केला. राजस्थानच्या या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली ती आक्रमक फलंदाज रियान परागने (Riyan Parag). ज्या मैदानावर मुंबई इंडियन्सचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्याच मैदानावर रियान परागने 54 धावांची नाबाद खेळी केली. यात त्याने 3 षटकार आणि 5 चौकार लगावले. याआधी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात रियानने 84 धावांची नाबाद खेळी करत राजस्थानला शानदार विजय मिळवून दिला होता.
रियान पराग राजस्थानचा बेस्ट फिनिशर ठरतोय. रियानच्या या कामगिरीवर टीम इंडियाचा (Team India) स्विंग मास्टर इरफान पठाणने भविष्यवाणी केली होती. हा मुलगा दोन वर्षात टीम इंडियात खेळेल असं इरफानने म्हटलं होतं. शेवटच्या षटकात रियान ज्या ताकदीने खेळतो, असे खूपच कमी खेळाडू आहेत, असंही इरफानने म्हटलंय. इरफानशिवाय अनेक दिग्गज खेळाडूंनीही रियानचं तोंडभरून कौतुक केलं आहे. भविष्यात टीम इंडियात बेस्ट फिनिशरची भूमिका निभावू शकतो असं दिग्गज क्रिकेटपटूंचं मत आहे. अनेक जाणकारांनी त्याची तुलना सूर्यकुमार यादवशी केली आहे.
आयपीएलच्या या हंगामात राजस्थान रॉयल्स आतापर्यंत तीन सामने खेळलीय. या तीनही सामन्यात रियान परागची बॅट तळपली आहे. लखनऊविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रियानने 43 धावा केल्या. तर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात 84 धावा आणि मुंबईविरुद्धच्या सामन्यात 54 धावा केल्या.
रियानचा दावा मजबूत?
यंदाच्या आयपीएल हंगामात रियान पराग जबरदस्त फॉर्मात आहे. केवळ फटकेबाजी न करता रियान प्रत्येक चेंडू योग्य पद्धतीने खेळतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे. याच टेक्निकमुळे आयपीएलचा हा हंगाम रियान परागसाठी टर्निंग पॉईंट साबित होऊ शकतो. रियान पराग केवळ 22 वर्षांचा असला तरी त्याच्या फलंदाजीत अनुभव आणि जबाबादारीची जाणीव होते. त्याची तुलना सूर्यकुमार यादवशी होतेय. स्वत: सूर्यकुमारनेही रियानच्या फलंदाजीचं कौतुक केलं आहे.
रियानची आयपीएलमधली कामगिरी
रियान पराग आयपीएलमध्ये आतापर्यंत 54 सामने खेळला असून यात त्याने 16.22 च्या अॅव्हरेजने 600 धावा केल्या आहेत. यात त्याने दोन अर्धशतकं केलीत. रियान 2018 मध्ये अंडर-19 वर्ल्डकपचा सदस्य होता. 2019 मध्ये राजस्थान रॉयल्सने 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये आपल्या संघात घेतलं.