`मी RCB साठी बोली लावतो तेव्हा...`, विराटचं नाव घेत विजय माल्यांचा मोठा खुलासा
IPL 2024 Vijay Mallya Post About Virat Kohli: विराट कोहलीने यंदाच्या पर्वामध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराट हा ऑरेंज कॅपचा मानकरी असून त्याने आतापर्यंत 14 सामन्यांमध्ये 708 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच अर्धशतकांचा आणि एका शतकाचा समावेश आहे.
IPL 2024 Vijay Mallya Post About Virat Kohli: इंडियन प्रिमिअर लीगच्या पहिल्या एलिमिनेटर सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने सनरायझर्स हैदराबादच्या संघावर मोठा विजय मिळवत अगदी थाटात अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. हा कोलकात्याचा चौथा अंतिम सामना ठरणार आहे. असं असतानाच आता दुसऱ्या एलिमिनेटर सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाचा सामना विराट कोहली मागील 18 वर्षांपासून ज्या बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध होणार आहे. हा सामना आज (22 मे 2024) सायंकाळी खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये जिंकणारा संघ पुढील सामना सन रायझर्स हैदराबादविरुद्ध पुढील सामना खेळून अंतिम सामन्यात प्रवेश करु शकतो. मात्र या सामन्यापूर्वीच आरसीबीचे मालक विजय माल्या यांनी सोशल मीडियावर यंदाच्या आयपीएलच्या अंतिम सामन्यासंदर्भात एक भाकित व्यक्त केलं आहे.
आरसीबीने अटीतटीचा सामना जिंकल्यानंतर माल्यांनी केलेलं कौतुक
18 मे रोजी झालेल्या साखळी फेरीतील आरबीसी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यामध्ये आरसीबीच्या संघाने 27 धावांनी विजय मिळवत प्लेऑफमधील स्थान निश्चित केलं. प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी आरसीबीला हा सामना किमान 18 धावांनी जिंकणं आवश्यक होतं. अत्यंत रोमहर्षक सामन्यात आरसीबीने चेन्नईऐवजी स्वत: प्लेऑफसाठी पात्र ठरत चाहत्यांना सुखद धक्का दिला. या विजयानंतर विजय माल्या यांनी संघाचं अभिनंदन केलं होतं. "आरसीबीचा संघ अव्वल चार संघांमध्ये राहिला आणि प्लेऑफसाठी पात्र ठारल्याबद्दल त्याचं अभिनंदन! निराशाजनक सुरुवातीनंतर दृढनिश्चयाने केलेली खेळी आणि कौशल्याच्या जोरावर मिळावलेला हा विजय आहे. ट्रॉफीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं," असं म्हणत माल्या यांनी आरसीबीच्या संघावर कौतुकाचा वर्षाव केला होता.
विराटचा उल्लेख करत माल्यांची पोस्ट
आता पुन्हा एकदा आज होणाऱ्या दुसऱ्या एलिमिनेटर सामन्याआधी विजय माल्या यांनी आरसीबी म्हणजे विराट कोहली असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न आपल्या नव्या पोस्टमधून केला आहे. आपण विराटची निवड केली आणि त्याहून उत्तम खेळाडू आपल्याला सापडला नसता अशा भावना माल्या यांनी आपल्या नव्या पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत. "मी जेव्हा आरसीबीसाठी बोली लावतो तेव्हा मी विराटसाठीच बोली लावत असतो. माझ्या आतल्या आवाजाने मला असं सांगितलं की, याहून उत्तम पर्याय मला निवडता आला नसता. माझा हाच आतला आवाज मला सांगत आहे की आरसीबीला यंदा आयपीएलचा चषक जिंकण्याची उत्तम संधी आहे. कायम प्रगती करत राहा. माझ्या शुभेच्छा!" असं विजय माल्यांनी नव्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
विराटची 5 अर्धशतकं
विराट कोहलीने यंदाच्या पर्वामध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराट हा ऑरेंज कॅपचा मानकरी असून त्याने आतापर्यंत 14 सामन्यांमध्ये 708 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच अर्धशतकांचा आणि एका शतकाचा समावेश आहे. विराटने यापूर्वी 2016 च्या पर्वामध्ये 973 धावा केल्या होत्या. हा स्वत:चा विक्रम मोडण्यासाठी विराटला अजून 266 धावांची गरज आहे.
नक्की वाचा >> विराट 'ते' 5 शब्द अन् पुढच्याच बॉलवर धोनीची विकेट! RCB च्या विजयामागील सिक्रेट उघड
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज सामना
आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आरसीबी आणि राजस्थानविरुद्धचा दुसरा एलिमिनेटर सामना खेळवला जाणार आहे. राजस्थानच्या संघाने 2008 साली पहिल्याच पर्वात आयपीएलच्या चषकावर नाव कोरलं होतं. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील या विजयाशिवाय राजस्थानला एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. त्यामुळे ते दुसऱ्यांदा आयपीएल चषक जिंकण्याच्या उद्देशाने या करो या मरोच्या सामन्यात मैदानात उतरतील. तर दुसरीकडे आरसीबीचा संघही पहिल्यांदाच चषक जिंकण्याच्या उद्देशानेच राजस्थानविरुद्धचा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात पाऊल ठेवेल.