T20 World Cup 2024 : 22 मार्चपासून आयपीएलला सुरुवात झाली असून आतापर्यंत तेरा सामने खेळवण्यात आले आहेत. 26 मे रोजी आयपीएलचा (IPL 2024) अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. 4 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. आयपीएलमधल्या दमदार कामगिरीच्या जोरावर टी20 वर्ल्ड कपसाठीच्या संघात जागा निश्चित होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमधल्या कामगिरीवर निवडकर्त्यांचं लक्ष
आयपीएलमधल्या प्रत्येक सामन्यावर भारतीय निवड समितीचं (BCCI Selection Committee) लक्ष असणार आहे. सीनिअर खेळाडू्ंबरोबरच युवा खेळाडूंनीही टी20 संघात जागा पटकावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. यापैकी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 


या खेळाडूंवर लक्ष
गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, संजू सॅमसन या खेळाडूंना संधी देण्यात आली नव्हती. या खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समितीचं विशेष लक्ष असणार आहे. याशिवाय ऋषभ पंतने पुन्हा आयपीएल पुनरागमन केलं आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात पंतने 51 धावांची खेळी करत टी20 वर्ल्ड कप संघात आपला दावा ठोकला आहे. याशिवाय, अभिषेक शर्मा, मयांक यादव या खेळाडूंनी पहिल्या दोन सामन्यातच आपली छाप उमटवली आहे. 


या खेळाडूंची जागा पक्की
टी20 वर्ल्ड कपसाठी काही खेळाडूंची जागा याआधीच पक्की झाली आहे. यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, जसप्रित बुमराह आणि रवींद्र जडेजा खेळाडूंचा समावेश आहे. विराट कोहलीबद्दल अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. पण आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यातील त्याची कामगिरी पाहाता त्याला डावलण्याचा विचार भारतीय निवड समिती करणार नाही. 


कोण असणार कर्णधार?
टी20 वर्ल्ड कपपूर्वी रोहित शर्मा भारतीय संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होणार अशी चर्चा होता. हार्दिक पांड्याकडे ही जबाबादी दिली जाईल असं बोललं जात होतं. पण बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या सर्व शक्यतांना पूर्णविराम लावला आहे. अनुभवी सलामी फलंदाज रोहित शर्माच टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करेल असं जय शाह यांनी स्पष्ट केलंआहे. 


या खेळाडूंना संधी मिळणार?
टीम इंडियात विकेटकिपर म्हणून केएल राहुल आणि ऋषभ पंत हे संभाव्य टीम इंडिया संघात प्रमुख दावेदार आहेत. तब्बल 14 महिन्यांनी ऋषभ पंतने मैदानावर पुनरागमन केलं आहे. आयपीएलमध्ये विकेटकिपिंग आणि फलंदाजीतही त्याने आतापर्यंत दमदार प्रदर्शन केलं आहे. याशिवाय जितेश शर्मा आणि संजू सॅमसनही या शर्यतीत आहेत. आयपीएलमधल्या कामगिरीच्या जोरावर या दोघांचा विचार केला जाऊ शकतो.


टी20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव , रवि बिश्नोई, जसप्रित बुमरा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह