`मी असतो तर हार्दिक पांड्याला...`, MI ने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवल्याने युवराज संतापला, `भविष्यात...`
IPL 2024: भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने मुंबई इंडियन्सच्या कर्णधार बदलण्याच्या निर्णयावर नाराजी जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार केलं आहे.
IPL 2024: आयपीएल स्पर्धेची घोषणा झाल्यापासून मुंबई इंडियन्स संघ सर्वाधिक चर्चेत आहे. याचं कारण मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा संघात घेण्यासाठी 16 कोटी मोजले. इतकंच नाही तर त्याला संघात घेतल्यानंतर रोहित शर्माची कर्णधारपदावरुन हकालपट्टी करत संघाचं नेतृत्वही दिलं. पाच वेळा मुंबई इंडियन्सला जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवल्याने चाहते प्रचंड नाराज झाले असून, सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
दोन वर्ष गुजरात टायटन्सकडून खेळल्यानंतर हार्दिक पांड्या पुन्हा मुंबईत परतला आहे. त्याला कर्णधार करण्याच्या निर्णयावर काहींनी टीका केली असताना, काहींनी मात्र भविष्याच्या दृष्टीने हा योग्य निर्णय असल्याचं कौतुक केलं आहे. मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनीही जाहीर मत मांडलं आहे. त्यात आता रोहित शर्माचा मुंबई इंडियन्समधील माजी सहकारी आणि अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनेही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
युवराज सिंगने मुंबई इंडियन्सच्या कर्णधार बदलण्याच्या निर्णयावर मोठं विधान केलं आहे. हार्दिकला संघात परत आणायचं असलं, तरी रोहितलाच कर्णधारपदी ठेवायला हवं होतं असं स्पष्ट मत युवराज सिंगने मांडलं आहे. यामुळे तो बदल अत्यंत सुरळीतपणे झाला असता असं त्याचं म्हणणं आहे.
"रोहित शर्माने कर्णधार म्हणून पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. त्याला कर्णधारपदावरुन हटवणं हा मोठा निर्णय आहे. पण जर मी असतो तर रोहितला आणखी एक हंगाम कर्णधार म्हणून खेळायला दिलं असतं आणि हार्दिकला उप-कर्णधार ठेवलं असतं. नेमकं सगळं कामकाज कसं चालतं हे पाहण्याची संधी दिली असती," असं युवराज सिंग म्हणाला आहे.
"पण मी संघाच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर समजू शकतो की, ते भविष्याचा विचार करत आहेत. पण तरीही रोहित अद्यापही भारतीय संघाचा कर्णधार असून चांगला खेळत आहे. त्यामुळे हा मोठा निर्णय आहे," असं युवराजचं म्हणणं आहे.
"प्रत्येकाचं वेगळं मत आहे. पण फ्रँचाइजीला भविष्याचा विचार करुन योग्य निर्णय घ्यायचा आहे. मला वाटतं यामागे तोच हेतू असून, तो योग्य ठरेल अशी आशा आहे," असं युवराजने म्हटलं आहे.
अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचं नेतृत्व करताना पहिल्याच वर्षी त्यांना आयपीएल स्पर्धा जिंकवून दिली होती. तसंच गतवर्षी संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता. अगदी शेवटच्या क्षणी चेन्नईने सामना हिरावून घेतला नसता तर गुजरात सलग दुसऱ्यांदा जिंकला असता. पण मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करताना हार्दिकवर दबाव असेल असं युवराजचं म्हणणं आहे.
त्याने म्हटलं आहे की, "त्याच्याकडे कौशल्य आहे यात काही वाद नाही. पण गुजरातचा कर्णधार असणं हे मुंबईच्या कर्णधारापेक्षा वेगळं आहे. त्यांच्याकडून फार अपेक्षा असून, मुंबई इंडियन्स टॉपच्या संघांपैकी आहे. तुम्हाला तो दबाव सहन करायचा आहे. त्याला चांगला पाठिंबा मिळेल याची मला खात्री आहे. ते चांगली कामगिरी करतील अशी आशा".