आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) एकाच संघात असते तर....भारतीय क्रिकेट संघातील हे दिग्गज खेळाडू आयपीएलच्या पहिल्या पर्वापासून खेळत असून, आज तिघांचीही गणना महान खेळाडूंमध्ये केली जाते. प्रत्येकाने आपला एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. हे तिघेही आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघात खेळत आहेत. पण जर तिघे एकाच संघाच आले तर काय होईल? आता हे कसं काय शक्य आहे असाच विचार तुमच्याही डोक्यात आला असेल. पण  जर धोनी, रोहित आणि कोहली यांच्यापैकी फक्त एकालाच खेळण्याची, एकाला बेंचवर बसण्याची आणि एकाला सोडण्याची विशिष्ट अट दिली तर हे सत्यात बदलू शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल वॉन आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज विकेटकिपर अॅडम गिलक्रिस्ट यांनी Cricket.com शी संवाद साधताना काही अशक्य शक्यतांवर भाष्य केलं. पण अशक्य असं काहीच नसतं यावर मायकल वॉनचा विश्वास आहे. 


इंग्लंडच्या माजी कर्णधाराने धोनीची खेळाडू म्हणून निवड करताना कोणताही संकोच व्यक्त केलेला नाही. तसंच त्याने धोनीला आपल्या संघाचा कर्णधार म्हणून निवडलं आहे. "मी धोनीला खेळवेन. मला वाटत नाही त्याच्यापेक्षा सर्वोत्तम कोणी आहे. विराटला जागा नसेल. धोनीच कर्णधार असेल आणि तो खेळेल," असं मायकल वॉन म्हणाला.


आयपीएलचा रोहित शर्मासह संयुक्त-सर्वाधिक यशस्वी कर्णधार धोनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महान खेळाडूंपैकी एक आहे. 264 सामन्यांसह, तो IPL मधील सर्वात जास्त खेळणारा खेळाडू आहे आणि विकेटकिपर  म्हणून सर्वाधिक विकेट (190) घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. गेल्या काही वर्षांत त्याने पहिल्या पाचमध्ये फलंदाजी केलेली नाही आणि तरीही, 39 च्या सरासरीने आणि 137 च्या स्ट्राइक रेटने 5243 धावा करून लीगमधील सहाव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पण अद्यापही तो चेन्नईकडून खेळत आहे. 


जेव्हा मायलक वॉनला रोहित किंवा विराट कोहलीपैकी एकाला विकण्यास सांगितलं तेव्हा त्याने विराटचं नाव घेतलं. "दुसरं काय होतं? कोणाला विकणार? मी विराटपासून सुटका करुन घेईन. त्याने एकदाही आयपीएल जिंकली नसल्याने मी त्याला घेणार नाही. रोहितने सहा वेळा आणि धोनीने पाचवेळ आयपीएल जिंकली आहे. त्यामुळे मी धोनीला खेळवेन आणि विराटला विकेन. रोहित शर्मा माझा राखीव खेळाडू असेल," असं मायकल वॉन म्हणाला.


2008 पासून एकाच फ्रँचायझीसाठी सर्व सीझन खेळणारा कोहली हा आयपीएलच्या इतिहासातील एकमेव क्रिकेटपटू आहे, तो अद्याप ही स्पर्धा जिंकू शकलेला नाही. पण धावसंख्येच्या बाबतीत तो इतरांपेक्षा वरचढ आहे. विराट कोहली 251 सामन्यांमध्ये 8004 धावांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर शिखर धवनने 222 सामन्यांमध्ये 6769 धावा केल्या आहेत.


मायकल वॉन म्हणाला की, कोहलीला दुसऱ्या फ्रँचायझीला विकणं चांगला पर्याय आहे. कारण यामुळे त्याला चांगली ट्रान्सफर फी मिळेल. "मला त्याच्यासाठी चांगली रोख रक्कम मिळू शकते. तो मोठ्या रकमेसाठी दुसरीकडे कुठेतरी जाईल. हा चांगला व्यवसाय आहे," असं तो पुढे म्हणाला. धोनीच्या जागी मुंबई इंडियन्सचा दिग्गज आणि सध्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्माला बेंचवर ठेवण्यात येईल, असे वॉनने सांगितले.