Mohammad Kaif on MS Dhoni: बीसीसीआयने (BCCI) इंडियन प्रीमियर लीगच्या 2025 आवृत्तीसाठी नियमांची घोषणा केली आहे. यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचं दिसत आहे. यामधील अनकॅप्ड खेळाडू नियमाची पुनरावृत्ती नियमाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सर्व भारतीय खेळाडू जे एकतर निवृत्त झाले आहेत किंवा गेल्या पाच किंवा अधिक वर्षांत भारताचं प्रतिनिधित्व केलेलं नाही, त्यांना अनकॅप्ड मानलं जाऊ शकतं. भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीसाठी हा नियम नव्याने आणला असावा अशी चर्चा यानिमित्ताने रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनाने 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पण यानंतर तो आयपीएलमध्ये सक्रीयपणे खेळत आहे. अनकॅप्ड प्लेअरच्या नियमामुळे चेन्नईला  धोनीला 4 कोटींमध्ये संघात कायम ठेवण्याची संधी मिळत आहे. यामुळे संघाला इतर प्रमुख खेळाडूंना रिटेन करण्याचीही संधी मिळत असून, मेगा लिलावासाठी पैशांची मोठी बचत करता येईल. 


धोनीने आयपीएलमधील आपल्या भवितव्यावर अधिकृतपणे काही भाष्य केलं नसलं तरी, या नव्या नियमामुळे चेन्नईला फायदा होत आहे यात काही दुमत नाही. धोनीला कमी पैशात रिटेन केल्यास चेन्नई संघ मेगा लिलावासाठी इतरांना स्पर्धा देत नेतृत्व करु शकेल आणि चाहत्यांच्या आवडत्या खेळाडूला रिटेन करु शकतं. 


दरम्यान धोनीच्या करिअरमधील सुरुवातीच्या दिवसांचा साक्षीदार असणाऱ्या मोहम्मद कैफने यावर स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे. धोनीचा वारसा अशा तडजोडींची हमी देतो असं मोहम्मद कैफ म्हणाला आहे.  CSK कर्णधार म्हणून पाच आयपीएल विजेतेपदांसह, धोनीचा मैदानावर आणि मैदानाबाहेरचा प्रभाव लीगमध्ये अतुलनीय राहिला आहे.


“आपण एमएस धोनीला पुन्हा खेळताना पाहू शकतो. तो तंदुरुस्त आहे, तो आक्रमक फलंदाजी करत आहे आणि चांगलं यष्टीरक्षणही करत आहे. जोपर्यंत त्याला खेळायचे आहे तोपर्यंत नियम बदलत राहतील. जर एमएस धोनीला खेळायचे असेल तर त्याला खेळू देण्यासाठी तुम्हाला नियम बदलावे लागतील किंवा जे शक्य ते सर्व करावं लागेल कारण आता तो एक मोठा खेळाडू असून, सीएसकेसाठी मॅच विनर आहे,” असं कैफने स्टार स्पोर्ट्सला सांगितले.


अनकॅप्ड खेळाडूंच्या नियमावर भाष्य करताना कैफने आपले शब्द राखून ठेवले नाहीत. तसंच धोनी संघासाठी जे गरजेचं असेल त्यानुसार कामगिरी करेल असंही म्हटलं. "तो तंदरुस्त आहे आणि चांगला खेळतोय तर मग का नाही? धोनीने स्वत:च मला पैशांची गरज नाही असं म्हटलं आहे. जे काही संघ व्यवस्थापन ठरवेल ते मी करेन असं तो म्हणाला आहे. त्याला 4 कोटीत रिटेन करणं हे थोडं विचित्र वाटत आहे, पण तुमच्याकडे ती संधी आहे," असं कैफने सांगितलं. धोनीमुळेच निमय बदलला हे सर्वांना माहिती आहे. आणि का नाही? धोनी त्या दर्जाचा खेळाडू आहे असंही त्याने म्हटलं.