`मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला...,` भारताच्या दिग्गज खेळाडूचं विधान, `बुमराहचं मूल्य पाहता त्याला...`
IPL 2025: मुंबई इंडियन्स माजी कर्णधार रोहित शर्मा, टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना संघात निःसंशयपणे कायम ठेवेल असा अंदाज आहे.
IPL 2025: बीसीसीआयने (BCCI) आगामी आयपीएल 2025 मेगा लिलावासाठी (IPL Mega Auction 2025) नव्या नियमांची घोषणा केली आहे. नोव्हेंबर महिन्यात मेगा लिलाव पार पडणार असा अंदाज आहे. जुलैमध्ये मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात सर्व 10 फ्रँचाईजची भेट घेतल्यानंतर लिलावाच्या नियमांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी बंगळुरू येथे आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची भेट घेतली. यादरम्यान प्रत्येक संघासाठी सहा रिटेंशन कमी करण्यात आले आहेत. राईट-टू-मॅच कार्डदेखील पर्यायांमध्ये आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अजय जाडेजाने JioCinema शी संवाद साधला. भारत आणि बांगलादेशमधील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसाने व्यत्यय आणल्याने अजय जाडेजा बोलत होता. यावेळी त्याने आपल्या खेळाडूंच्या निवडीवरुन टीकेचा धनी झालेल्या मुंबई इंडियन्सवर भाष्य केलं. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला रिलीज करावं आणि राईड-टू-मॅच कार्डचा वापर करत आपल्या कर्णधाराला परत मिळवावं असा सल्ला दिला आहे.
जडेजाने म्हटलं आहे की, मुंबई इंडियन्सने माजी कर्णधार रोहित शर्मा, विद्यमान भारताचा T20I कर्णधार सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना निःसंशयपणे कायम ठेवावे आणि हार्दिकला रिलीज करावं. हार्दिकला लिलावात परत घेता येईल. कारण इतर फ्रँचायझी अष्टपैलू खेळाडूला झालेल्या दुखापती पाहता त्याला संघात घेण्याची शक्यता कमी आहे.
"मी म्हणेन की, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह हे तीन खेळाडू निःसंशयपणे मुंबई इंडियन्सकडून रिटेन केले जातील. हे खेळाडू लिलावासाठी ठेवल्यास ते मिळवणे अशक्य आहे. शिवाय, मला वाटतं की मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्यासाठी आरटीएम कार्डचा वापर करु शकतं. तो ज्या प्रकारचा खेळाडू आहे, ते पाहता तोदेखील तुम्हाला मिळणार नाही (लिलावात). पण त्याच्या दुखापतीमुळे इतर संघ त्याला संघात स्थान देताना विचार करतील हेदेखील तितकंच खरं आहे," असं जडेजाने सांगितलं आहे.
बुमराह हा हार्दिकपेक्षा अधिक मौल्यवान असल्याचं मत अजय जाडेजाने मांडलं आहे. आरटीएम मुंबईसाठी फायदेशीर ठरु शकतं असंही त्याचं म्हणणं आहे. "जर तुमच्याकडे आरटीएम असेल, तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. मी असे म्हणत नाही की हे खेळाडूची क्षमता किंवा शक्ती ठरवते, परंतु जर तुम्ही बुमराहसारखा खेळाडू आणि त्याचे मूल्य आणि नंतर हार्दिक पांड्याही मार्केटमध्ये असेल तर निर्णय घेणं फार कठीण होईल,” असं जडेजा पुढे म्हणाला.