IPL 2025 Rohit Sharma Suryakumar Yadav To leave MI: इंडियन प्रिमिअर लीग 2025 संदर्भात लवकरच काही धोरणात्मक निर्णय नव्याने होण्याची शक्यता आहे. खेळाडूंची खरेदी, संघांना अधिकची रक्कम वाढवून देण्याचा निर्णय यासारख्या गोष्टींबद्दल लवकरच संघमालकांबरोबर चर्चा होईल असं सांगितलं जात आहे. मात्र या आयपीएलआधीच सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीचा कणा मानले जाणारे दोन स्फोटक फलंदाज संघाला सोडचिठ्ठी देण्याची दाट शक्यता आहे. टी-20 वर्ल्ड कप विजेता कर्णधार आणि मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माबरोबरच नव्याने भारतीय टी-20 संघाची धुरा संभाळणारा सूर्यकुमार यादवही मुंबईची साथ सोडू शकतो अशी माहिती समोर येत आहे.


रोहित आणि सूर्यकुमारला संघात घेण्यासाठी हा संघ पहिला दावेदार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच वेळा आयपीएलचा चषक जिंकणाऱ्या मुंबईच्या संघापासून रोहित आणि सूर्यकुमार यादव 2025 च्या स्पर्धेआधी वेगळे होऊ शकतात, असं वृत्त दैनिक जागरणने दिलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या दोघांनाही आपल्या संघात वाटेल ती बोली लावून घेण्याचा प्रयत्न विद्यमान विजेता संघ असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सकडून केला जाईल असंही म्हटलं जात आहे. त्यातही सूर्यकुमार यादव मुंबईच्या संघात येण्यापूर्वी विद्यमान मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील केकेआरच्या संघात खेळलेला आहे. आपल्या दुसऱ्याच पर्वात सूर्यकुमार यादव केकेआरचा उपकर्णधार होता.


मुंबईची यंदा सुमार कामगिरी


मुंबई इंडियन्सच्या संघासाठी 2024 चं आयपीएलचं पर्व फारच कठीण गेलं. त्यांनी 2023 च्या शेवटी गुजरात टायटन्सकडून हार्दिक पंड्याला पुन्हा आपल्या संघात घेतलं. एवढ्यावर न थांबता मुंबईने रोहित शर्माला बगल देत हार्दिकला थेट कर्णधार केलं. मात्र हा निर्णय चाहत्यांना फारसा पटला नाही आणि हार्दिकची अनेक ठिकाणी संघाच्या चाहत्यांकडूनच हुर्यो उडवली गेली. हार्दिक आणि रोहित शर्मामध्ये मैदानातील मतभेद दिसून आले. रोहित, सूर्यकुमार आणि जसप्रीत बुमराहसारखे तिशी ओलांडलेल्या ज्येष्ठ खेळाडूंना हार्दिकच्या नेतृत्वामध्ये खेळण्यात अडचण असल्याच्या बातम्याही समोर आल्या. या साऱ्याचा परिणाम खेळावर झाला आणि पॉइण्ट्स टेबलमध्ये मुंबईचा संघ तळाशी राहिला. 


मुंबईची वाट खडतर


आता 2025 च्या पर्वामध्ये सारं काही ठीक होईल या मुंबईच्या अपेक्षेवर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यांनी संघ सोडल्यास पुन्हा पाणी फिरेल यात शंका नाही. हे दोघेही निघून गेले तर त्यांची जागा घेण्यासाठी खेळाडू शोधणं मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाला फार कठीण ठरेल. मात्र रोहित आणि सूर्यकुमार खरोखरच संघ सोडणार आहेत का याबद्दल अद्याप तरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांनी आताच निराश होण्याची गरज नाही.


नक्की वाचा >> हार्दिकची अनेक लफडी? नताशाने रंगेहाथ पकडल्यानंतर...; धक्कादायक दाव्याने एकच खळबळ


रोहितसाठी शर्यत तर हे खेळाडूही सोडणार आपले संघ


रोहित शर्माने खरोखरच मुंबईच्या संघाला सोडचिठ्ठी दिली तर तो गुजरात टायटन्स किंवा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळू शकतो असं सांगितलं जात आहे. गुजरातला यंदाच्या पर्वात शुभमन गिलकडून अपेक्षित निकाल मिळालेले नाहीत. दुसरीकडे ऋषभ पंतही दिल्लीबरोबर कायम राहणार की नाही याबद्दल शंका आहे. पंतच्या कामगिरी दिल्ली संघाचं व्यवस्थापन समाधानी नसून पंत स्वत: चेन्नई सुपर किंग्जमधून खेळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही संघ रोहितला आपल्या टीममध्ये घेण्यास उत्सुक असतील. तसेच या शर्यतीमध्ये केकेआरही असेल असं सांगितलं जात आहे. रोहितप्रमाणेच के. एल. राहुलसुद्धा आपल्या लखनऊ सुपर जायंट्सचा संघ सोडून विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळण्याची शक्यता आहे.