मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीचा लिलाव मंगळवारी जयपूरमध्ये पार पडला. या लिलावामध्ये मुंबईच्या टीमनं युवराज सिंग आणि लसिथ मलिंगाला विकत घेतलं. मुंबईनं युवराजला १ कोटी आणि मलिंगाला २ कोटी रुपये देऊन टीममध्ये सहभागी केलं. लिलावाच्या पहिल्या सत्रामध्ये या दोन्ही खेळाडूंवर बोली न लागल्यामुळे ते विकले गेले नाहीत. पण दुसऱ्या सत्रामध्ये या दोघांचं नाव पुन्हा एकदा आल्यामुळे मुंबईनं दोघांवर बोली लावली, आणि दोघांना त्यांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या लिलावामध्ये मुंबईनं विकत घेतलेल्या सगळ्या खेळाडूंना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं शुभेच्छा दिल्या आहेत. याबद्दलचं एक ट्विट सचिन तेंडुलकरनं केलं आहे. मुंबईनं लिलावामध्ये अनुभव आणि युवा खेळाडूंची योग्य सरमिसळ केल्याचं ट्विट सचिननं केलं. मलिंग आणि युवराजबरोबरच सचिननं मुंबईच्या टीममध्ये दाखल झालेल्या बरिंदर श्रन, अनमोलप्रीत सिंग, पंकज जयस्वाल आणि रसिक दार यांचंही अभिनंदन केलं आहे. 



मुंबईनं लिलावामध्ये लसिथ मलिंगाला २ कोटी आणि युवराज सिंगला १ कोटी रुपये देऊन विकत घेतलं. तर युवा खेळाडू बरिंदर श्रनला ३.४० कोटी, अनमोलप्रीत सिंगला ८० लाख रुपये आणि रसिक दार, पंकज जयस्वाल यांना प्रत्येकी २० लाख रुपये दिले. 


मुंबईच्या टीममध्ये निवड झाल्यानंतर युवराजनं ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईच्या कुटुंबात जोडला गेल्याचा मला अभिमान वाटत असल्याचं युवराज म्हणाला.



आता अशी असेल मुंबईची टीम


रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तरे, क्विंटन डी कॉक, कायरन पोलार्ड, बेन कटिंग, मिचेल मॅकलेनघन, ऍडम मिलन, जेसन बेहरेनड्रॉफ, युवराज सिंग, रसिख सलाम, पंकज जैसवाल, बरिंदर श्रन अनमोलप्रीत सिंग, लसिथ मलिंगा