जयपूर : आयपीएलच्या १२व्या मोसमासाठी जयपूरमध्ये लिलाव पार पडला. या लिलावामध्ये सगळ्यांना धक्का देणारं नाव ठरलं ते वरुण चक्रवर्ती याचं. तामीळनाडूचा असलेल्या वरुण चक्रवर्तीची बेस प्राईज २० लाख रुपये होती, पण त्याला ८.४० कोटी रुपयांमध्ये विकत घेण्यात आलं. यंदाच्या आयपीएल लिलावातला वरुण हा जयदेव उनाडकटसोबतचा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. पण बेस प्राईजचा विचार करता वरुणला सर्वाधिक रक्कम मिळाली. उनाडकटची बेस प्राईज १.५ कोटी रुपये एवढी होती. म्हणजेच वरुण चक्रवर्तीला त्याच्या बेस प्राईजच्या ४२ पट जास्त रक्कम मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरुण चक्रवर्ती या मिस्ट्री स्पिनरला पंजाबच्या टीमनं विकत घेतलं. २७ वर्षांच्या वरुण चक्रवर्तीनं आत्तापर्यंत फक्त एक प्रथम श्रेणी मॅच आणि ९ लिस्ट ए मॅच खेळल्या आहेत. आयपीएलमध्ये वरुणनं आत्तापर्यंत एकही मॅच खेळलेली नाही. तामीळनाडू प्रीमिअर लीगमध्ये वरुणनं सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. या स्पर्धेत वरुणनं ९ मॅचमध्ये २२ विकेट घेतल्या होत्या. आता आयपीएलमध्ये वरुण पहिल्यांदाच आर. अश्विन आणि मोहम्मद शमीबरोबर खेळणार आहे.


IPL 2019 Auction: काही खेळाडू कोट्यधीश, काहींच्या पदरी निराशा, पाहा संपूर्ण यादी


 


तामीळनाडू प्रीमिअर लीगमधल्या कामगिरीमुळेच वरुणवर पंजाबच्या टीमनं एवढी मोठी बोली लावली. वरुणनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये ४.७ च्या इकोनॉमी रेटनं ९ विकेट घेतल्या आहेत. विजय हजारे ट्रॉफीमध्ये वरुण दुसरा यशस्वी बॉलर ठरला होता. वरुण याआधी टेनिस बॉलनं क्रिकेट खेळायचा. टेनीस बॉलच्या व्हेरियेशन्सचा प्रयोग त्यानं सिझन बॉल क्रिकेटमध्ये केला आणि यशस्वी झाला. मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळख असणाऱ्या वरुण चक्रवर्ती वेगवेगळ्या प्रकारचे ७ बॉल टाकू शकतो.


वरुण चक्रवर्तीनं त्याच्या क्रिकेटची सुरुवात शाळेपासूनच केली होती. पण अंडर-१७ आणि अंडर-१९ क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी न केल्यामुळे त्यानं क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर वरुणनं ५ वर्ष आर्किटेक्चरचा कोर्स केला आणि एक वर्ष नोकरी केली. नोकरी करत असतानाच वरुणनं पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ यावेळेत काम करण्यात वरुणला रस नसल्यामुळे त्यानं पुन्हा क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं. २५व्या वर्षी वरुण चक्रवर्तीनं पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवलं आणि मेहनत करायला सुरुवात केली. आज वरुण चक्रवर्तीवर झालेल्या पैशांच्या वर्षावामुळे त्याच्या मेहनीतचं चीझ झालं असंच म्हणावं लागेल. 


IPL 2019 Auction: दिग्गजांना दणका, कोणीच बोली लावली नाही