मुंबई : कर्नाटकने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत विजय मिळवला. याचसोबत भारताचा स्थानिक टी-२० मॅचचा मोसमही संपला आहे. या स्पर्धेवर भारतीय क्रिकेट रसिकांपेक्षा आयपीएलच्या टीमची जास्त नजर होती. १९ डिसेंबरला कोलकात्यामध्ये आयपीएलच्या २०२० सालासाठी लिलाव होणार आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली त्यांना लिलावात चांगली रक्कम मिळण्याची शक्यता आहे.


प्रियम गर्ग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशच्या मेरठचा प्रियम गर्गची अंडर-१९ वर्ल्ड कपच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली आहे. पुढच्या महिन्यापासून अंडर-१९ वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. पण त्याआधी होणाऱ्या आयपीएलच्या लिलावात प्रियम गर्गवर पैशांचा पाऊस पडू शकतो. प्रियम गर्ग हा उत्तर प्रदेशच्या टीमचा मधल्या फळीतील सदस्यही आहे. भरवशाचा आणि आक्रमक बॅट्समन म्हणून प्रियमची थोड्याच कालावधीत ओळख झाली आहे.


देवदत्त पडिक्कल


कर्नाटकची टीम ही सध्या भारतीय क्रिकेटमधली मजबूत टीम आहे. मनिष पांडे, केएल राहुल, मयंक अग्रवाल, करुण नायर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबरच देवदत्त पडिक्कल यानेही योगदान दिलं आहे. देवदत्तने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक ६०९ रन केले आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही देवदत्त ५८० रनसह सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरला.


यशस्वी जयस्वाल 


१७ वर्षांच्या यशस्वी जयस्वालची ओळख मोठे सिक्स मारणारा आणि मोठ्या खेळी करणारा खेळाडू अशी झाली आहे. १३ वर्षांचा असतानाच यशस्वी उत्तर प्रदेशमधून मुंबईत आला. मुंबईत त्याने तंबूमध्ये रात्री घालवल्या. एवढच नाही तर पाणीपुरी आणि फळंही विकली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये यशस्वीने द्विशतक केलं. लिस्ट ए मध्ये द्विशतक करणारा जयस्वाल सगळ्यात लहान क्रिकेटपटू ठरला.


धोनीच्या झारखंडमधून नवा विराट


धोनीच्या झारखंडमधून नवा विराट भारतीय क्रिकेटची दारं ठोठावत आहे. डावखुरा बॅट्समन विराट सिंगने मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ५७.१६च्या सरासरीने आणि १४२.३२ च्या स्ट्राईक रेटने ३४३ रन केले. विराट झारखंडसाठी तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करतो. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने ७ मॅचमध्ये ८३.७५ च्या सरासरीने ३३५ रन केले.


जय बिष्टा


मुंबईच्या २३ वर्षीय जय बिष्टाने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत ६ मॅचमध्ये ५१.२० च्या सरासरीने आणि १५४.२१ च्या स्ट्राईक रेटने २५६ रन केले. कर्नाटकचा रोहन कदम, तामीळनाडूचा शाहरुख खान यानेही चांगली बॅटिंग केली, त्यामुळे आयपीएल लिलावात या खेळाडूंवर सगळ्याच टीमचं लक्ष असेल.