मुंबई : २०१९ सालच्या आयपीएलसाठीचा लिलाव १८ डिसेंबरला जयपूरमध्ये होणार आहे. ७० खेळाडूंच्या लिलावासाठी यावेळी तब्बल १००३ खेळाडूंनी अर्ज केले आहेत. यामध्ये एकूण २३२ परदेशी आणि उरलेले भारतीय खेळाडू आहेत. नाव नोंदवलेल्या १००३ खेळाडूंपैकी ८०० खेळाडूंनी एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेली नाही. या ८०० पैकी ७४६ खेळाडू भारताचे आहेत. बीसीसीआयनं बुधवारी याची घोषणा केली आहे. १८ डिसेंबरला जयपूरमध्ये यातल्या फक्त ७० खेळाडूंवर बोली लागणार आहे.


सर्वाधिक परदेशी खेळाडू दक्षिण आफ्रिकेचे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या लिलावासाठी नाव नोंदवण्यात आलेले सर्वाधिक खेळाडू दक्षिण आफ्रिकेचे आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या ५९ खेळाडूंनी, ऑस्ट्रेलियाच्या ३५, वेस्ट इंडिजच्या ३३, श्रीलंकेच्या २८, अफगाणिस्तानच्या २७, न्यूझीलंडच्या १७, इंग्लंडच्या १४ आणि बांगलादेशच्या १० खेळाडूंनी लिलावासाठी त्यांचं नाव नोंदवलं आहे. या यादीमध्ये अमेरिका, हाँगकाँग आणि आयर्लंडच्या प्रत्येकी १-१ खेळाडूचा समावेश आहे.


रिचर्ड मेडले लिलावात नाही


आयपीएलच्या लिलावात दरवर्षी असणारे रिचर्ड मेडले यावेळी दिसणार नाही. त्यांच्याऐवजी ही जबाबदारी ह्यू ऍडमिडेस यांना सोपवण्यात आली आहे. ऍडमिडेस यांना लिलाव करणारी कंपनी क्रिस्टीमध्ये ३० वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे. रिचर्ड मेडले यावेळच्या लिलावात का असणार नाहीत याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.


टीमनी ७१ खेळाडू सोडले


आयपीएलच्या ८ टीमनी एकूण ७१ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यातल्या दिल्लीच्या टीमनं सर्वाधिक १३ खेळाडू सोडून दिले. तर चेन्नईनं सगळ्यात कमी ३ खेळाडूंना सोडलं.