मुंबई: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्लीच्या खेळाडूंनी तुफान आणलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पृथ्वी शॉच्या झंझावाती खेळीपुढे कोलकाता संघाने गुडघे टेकले. पहिल्याच ओव्हरमध्ये 6 चौकार ठोकत त्याने जबरदस्त धावा संघाला मिळवून दिल्या. पृथ्वी शॉने 41 बॉलमध्ये 82 धावांची खेळी केली. तर शिखर धवननं 46 धावा केल्या. ऋषभ पंत 16 धावा काढून तंबूत परतला. दिल्ली संघाने कोलकातावर 7 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या या विजयात पृथ्वी शॉ-धवनचा सिंहाचा वाटा आहे. दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाता संघाने 20 ओव्हरमध्ये 154 धावा करत आपले 6 गडी गमावले. दिल्लीच्या अक्षर पटेल आणि ललित यादवने प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या. आवेश खान आणि स्टोइनस यांनी एक-एक विकेट घेतली. दिल्ली संघासमोर 155 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं.


दिल्ली संघातील पृथ्वी शॉ आणि धवन या जोडीनं मैदानात तुफान आणलं. शॉनं 6 चौकार ठोकले. शिखरचं अर्धशतक हुकलं तर पृथ्वी शतकापासून 18 धावा दूर राहिला. 




दिल्ली संघाने राजस्थान, बंगळुरू असे दोन सामने आतापर्यंत गमावले आहेत. तर चेन्नई विरुद्ध 7 विकेट्सने, पंजाब विरुद्ध 6 विकेट्सनं मुंबई विरुद्ध 6 विकेट्सनं हैदराबाद विरुद्ध सुपरओव्हर खेळून दिल्लीने विजय मिळवला होता. बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात केवळ 1 रनसाठी सामना हातून निसटला. त्यानंतर पुन्हा एकदा दमदार कमबॅक करत 7 विकेट्सनं दिल्लीनं कोलकाता विरुद्ध झालेला सामना जिंकला आहे. 


 


पॉइंट टेबलमध्ये चेन्नई 6 सामने खेळून पहिल्या स्थानावर आहे. तर दिल्ली 7 सामने खेळून दुसऱ्या स्थानावर आहे. बंगळुरू तिसऱ्या तर मुंबई चौथ्या स्थानावर आहे. कोलकाता संघ 7 पैकी 2 सामने जिंकला तर 5 पराभूत झाल्यानं पाचव्या स्थानावर आहे.