`हे बेकायदेशीर आहे,` IPL मधील रेकॉर्डब्रेकिंग धावसंख्या पाहून पाकिस्तानी खेळाडू संतापला, म्हणतो `पैसे घेऊन...`
IPL 2024: आयपीएलच्या (IPL) या हंगामात धावांचा पाऊस पडत असून, सहजपणे 200 चा आकडा पार केला जात आहे. सनरायजर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) या यादीत पहिल्या क्रमांकावर असून दिल्लीविरोधातील (Delhi Capitals) सामन्यात त्यांनी फक्त 6 ओव्हर्समध्ये 125 धावा ठोकल्या.
IPL 2024: आयपीएलच्या (IPL) या हंगामात धावांचा पाऊस पडत आहे. या हंगामात फलंदाज आतापर्यंतच्या बेस्ट फॉर्ममध्ये असून गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढत आहेत. यामुले संघांना 200 ची धावसंख्या पार करणं अत्यंत सहज होत आहे. सनरायजर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) या यादीत पहिल्या क्रमांकावर असून दिल्लीविरोधातील (Delhi Capitals) सामन्यात त्यांनी फक्त 6 ओव्हर्समध्ये 125 धावा ठोकल्या होत्या. सनरायजर्स हैदराबादने आतापर्यंत 287/3 (विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू), 277/3 (विरुद्ध मुंबई इंडियन्स) आणि 266/7 (विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स) इतक्या मोठ्या धावसंख्या गाठल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 272 धावांचा डोंगर उभा केला होता.
सनरायजर्स हैदराबादने दिल्लीविरोधातील सामन्यात तर कहर केला होता. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी केलेल्या तुफान फलंदाजीच्या जोरावर त्यांनी फक्त 6 ओव्हर्समध्ये 125 धावा केल्या होत्या. फक्त 5 ओव्हर्समध्ये त्यांनी 100 धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू वसीम अक्रमने मोठ्या धावसंख्यांवर प्रतिक्रिया नोंदवताना मोठं विधान केलं आहे.
"5 ओव्हर्समध्ये 100 धावा करणं बेकायदेशीर आहे. तुम्ही फूलटॉस गोलंदाजी केली तरी हे होऊ शकत नाही. तुम्ही गोलंदाजांची धुलाई व्हावी म्हणून पैसे देत आहात. मला या फॉरमॅटमध्ये गोलंदाजांसाठी फार वाईट वाटत आहे. पण जे आहे ते आहे. गोलंदाजांना आता थोडा वेगळा विचार करुन गोलंदाजी करायला हवी. 5 ओव्हर्समध्ये 100 धावा हे अविश्वसनीय आहे," असं वसीम अक्रमने Sportskeeda शी संवाद साधताना सांगितलं.
"सनरायजर्स हैदराबादबद्दल बोलायाचं गेल्यास ऑस्ट्रेलिया ज्याप्रकारे खेळते त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्यावर प्रेम करतो. कोण म्हणतं जलदगती गोलंदाज चांगलं नेतृत्व करतो. जेव्हा पाकिस्तान संघाने जलदगती गोलंदाजाला (शाहीन आफ्रिदी) कर्णधार केलं तेव्हा ती वेगळी बाब होती. त्यात सनरायजर्स हैदराबादकडे ट्रेविड हेडच्या रुपात आणखी एक धोकादायक खेळाडू आहे. कोणत्याही संघात हैदराबादपेक्षा जास्त धोकादायक फलंदाज नाहीत. हेनरिक क्लासेन हा एक माझा टी-20 मधील आवडता खेळाडू आहे. तो कोणत्याही चेंडूवर षटकार लगावू शकतो. अब्दुल समद हा सर्वोत्तम फिनिशर आहे. यामुळेच सनरायजर्स हैदराबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाने संघाला चांगली दिशा दिली आहे," असंही वसीम अक्रमने म्हटलं आहे.
पुढे त्याने सांगितलं की, "270 पेक्षा जास्त धावा करणं हे थोडं अतीच झालं. हे म्हणजे तुम्ही 50 ओव्हर्समध्ये 500 धावा कऱण्यासारखं आहे. क्रिकेट किती बदललं आहे हे यातून दिसत आहे. सीमा कमी झाल्या असतील, पण मैदानं गेल्या 30 वर्षांपासून सारखीच आहेत. पण खेळण्याची पद्दत बदलली आहे".