भारताचा आणि चेन्नई संघाचा सर्वातत यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) ओळखलं जातं. यामुळे त्याचे देशभरात चाहते असून, त्याची अक्षरश: पूजा करतात. महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आपल्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. पण आयपीएलमध्ये (IPL) असे अनेक क्षण आले जेव्हा धोनी प्रचंड संतापलेला दिसला. मागील आयपीएलमध्ये बंगळुरुने पराभव केल्याने चेन्नईचं पुन्हा एकदा आयपीएल जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरुने फक्त चेन्नईचा पराभव केला नव्हता तर प्लेऑफसाठी सुरु असलेल्या चुरशीच्या लढतीत आपलं स्थान पक्कं केलं होतं. या पराभवासह चेन्नई संघ स्पर्धेतून बाहेर पडला होता. विजयानंतर बंगळुरु संघ आक्रमकपणे विजय साजरा करत होता. त्यांचं सेलिब्रेशन फार काळ लांबलं होतं. यामुळे चेन्नईच्या खेळाडूंना हस्तांदोलन करण्यासाठी वाट पाहावी लागली होती. यादरम्यान रांगेत पहिल्या क्रमांकावर असणारा महेंद्रसिंग धोनी हस्तांदोलन न करताच ड्रेसिंग रुमच्या दिशेने गेला होता. 


चेन्नईचा माजी खेळाडू आणि धोनीचा माजी सहकारी हरभजन सिंग यावेळी समालोचन करत होता. धोनीने ड्रेसिंग रुमकडे जाताना स्क्रीनवर जोरात बुक्की मारली होती असा खुलासा हरभजन सिंगने केला आहे. "बंगळुरु संघ आनंद साजरा करत होता. ज्याप्रकारे ते जिंकले आणि पात्र झाले ते पाहता त्यांना तो आनंद साजरा कऱण्याचा पूर्ण हक्क होता," असं हरभजनने स्पोर्ट्स यारीशी बोलताना सांगितलं. 


"मी पायऱ्यांवरुन पाहत होतो, तेव्हा बंगळुरुचे खेळाडू सेलिब्रेट करत होते. चेन्नईचे खेळाडू हस्तांदोलन करण्यासाठी रांगेत उभे होते. बंगळुरुला सेलिब्रेट करत असल्याने वेळ लागला. त्यांचं सेलिब्रेशन संपलं तोपर्यंत धोनी आत गेला  होता. जाताना त्याने ड्रेसिंग रुममध्ये जाण्याआधी स्क्रीनवर जोरात बुक्की मारली," असं हरभजनने सांगितलं.


'बंगळुरुला आनंद साजरा करण्याचा हक्क होता'


बंगळुरुने सेलिब्रेट केल्यानतंर  हस्तांदोलनासाठी पोहोचण्यासाठी काही सेकंद जास्त घेतली. पण यासाठी बंगळुरुला दोष देऊ शकत नाही असं हरभजन सिंगने म्हटलं आहे. "त्यांनी काही मिनिटं सेलिब्रेट केलं असलं तरी तो त्यांचा हक्क होता. धोनी निघून गेला, पण ठीक आहे. त्यावेळी त्याचा तो विचार होता. त्या दिवशी सामना जिंकण्याचं, आयपीएल जिंकण्याचं आणि विजयासह आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचं त्याचं स्वप्न कदाचित मोडलं होतं," असं हरभजन म्हणाला.


आरसीबीने आयपीएलमध्ये अप्रतिम पुनरागमन केलं होतं. सहा सामने गमावल्यानंतर त्यांनी सलग पाच सामने जिंकले होते. चेन्नईने प्लेऑफमधील स्थान निश्चित केलं होतं, फक्त त्यांच्यापुढे बंगळुरुचा अडथळा होता. बंगळुरुने लक्षणीय फरकाने सामना जिकणं हा एकमेव पर्याय होता. त्यामुळो दोन्ही संघांसाठी हा नॉकआऊट म्हणजेच करो या मरो सामना होता जो बंगळुरुने जिंकला.