Ipl Auction 2022 Date : मेगा ऑक्शनच्या तारखा जाहीर
Ipl 2022 Mega Auction ची तारीख निश्चित. या शहरात पार पडणार लिलाव प्रक्रिया.
मुंबई : अखेर प्रतीक्षा संपली आहे. IPL 2022 साठीच्या मेगा ऑक्शनच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. झी 24 तासने दिलेली बातमी खरी ठरली आहे. आयपीएल मेगा ऑक्शन 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे. बंगळुरूमध्ये मेगा ऑक्शन होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आयपीएल मेगा ऑक्शनसाठी 590 खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं आहे. यंदा 10 संघ स्पर्धेसाठी उतरणार आहेत. प्रत्येक संघाला 3 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी होती. यंदाची स्पर्धा सर्वात मोठी होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
शिखर धवन, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशान किशन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, इशांत शर्मा, उमेश यादव या खेळाडूंवर सर्वात जास्त बोली कोण लावणार? सगळेच खेळाडू उत्तम खेळत असल्याने कोणाच्या पदरात किती पैसे पडणार यासाठी चुरस लागली आहे.
या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता आहे. त्याच सोबत आता RCB चं कर्णधारपद कोणाकडे जाणार हे देखील पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान बीसीसीआयने 22 जानेवारीला आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी नोंदवलेल्या एकूण खेळाडूंची नावं जाहीर केली होती. आयपीएलच्या 15 व्या मोसमात 2 संघ नव्याने जोडले गेले आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ असे दोन नवे संघ असणार आहेत. स्पर्धेत 2 नवे संघ आल्याने स्पर्धेचा थरार आणखी वाढणार आहे.
या 15 व्या मोसमाचं आयोजन हे महाराष्ट्रातील 4 स्टेडियममध्ये होण्याची तीव्र शक्यता आहे. मुंबईतील वानखेडे, बेब्रॉन, नवी मुंबईतील डी वाय पाटील आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. मात्र याबाबत अजून बीसीसीआयने अधिकृत घोषणा केलेली नाही.