IPL Mega Auction: वैभव सूर्यवंशीला वयाच्या 13 व्या वर्षी खेळवणं कायदेशीर आहे का? नियम काय सांगतो?
IPL Mega Auction: बिहारचा 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मेगा लिलावात वैभव सूर्यवंशीला 1 कोटी 10 लाखांत खरेदी केलं. मात्र इतक्या छोट्या वयात वैभव सूर्यवंशी खेळण्यास पात्र आहे का? यासंबंधी विचारणा होत आहे.
IPL Mega Auction: आयपीएल मेगा लिलावात बिहारच्या 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) रेकॉर्ड केला आहे. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मेगा लिलावात वैभव सूर्यवंशीला 1 कोटी 10 लाखांत खरेदी केलं. यानंतर तो आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. वैभव सूर्यवंशीची बेस प्राईस 30 लाख ठेवण्यात आली होती. मात्र दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये वैभवला संघात घेण्यासाठी चांगलीच चुरस दिसली. अखेर राजस्थान रॉयल्सने 1 कोटी 10 लाखात त्याला विकत घेतलं.
"नागपूरच्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये वैभवचं प्रशिक्षण झालं आहे. त्याने आमच्या कोटिंग स्टाफला चांगलंच प्रभावित केलं आहे," असं राजस्थान रॉयल्सचे सीईओ जेक लुश मॅकरम यांनी सांगितलं आहे. "त्याच्याकडे प्रचंड कौशल्य असून, उत्तम खेळाडू आहे. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी त्याला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. पण आम्ही संघात त्याचं स्वागत करताना फार उत्साही आहोत," असंही ते म्हणाले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी किमान वय धोरण लागू केले, ज्यामध्ये जागतिक स्तरावर खेळण्यासाठी खेळाडूंचं वय किमान 15 वर्षे असणं आवश्यक आहे. तथापि, अपवादात्मक प्रकरणांमध्ये, क्रिकेट बोर्ड 15 वर्षाखालील खेळाडूंना त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची परवानगी देण्यासाठी ICC कडे विशेष परवानगीची विनंती करू शकतात.
1996 ते 2005 दरम्यान सात कसोटी आणि 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारा पाकिस्तानचा हसन रझा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता. उजव्या हाताच्या फलंदाजाने 1996 मध्ये म्हणजे आयसीसीने नियम तयार करण्याच्या 24 वर्षं आधी अवघ्या 14 वर्षे आणि 227 दिवसांच्या वयात कसोटी पदार्पण केलं होतं.
"बोर्डाने खेळाडूंच्या सुरक्षेत सुधारणा करण्याच्या हेतूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी किमान वयोमर्यादा लागू केल्यास दुजोरा दिला आहे. ही वयोमर्यादा आयसीसी इव्हेंट, द्विपक्षीय क्रिकेट आणि अंडर 19 क्रिकेटसह सर्व क्रिकेटमध्ये लागू होईल. पुरुष, महिला किंवा अंडर 19 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात खेळण्यासाठी खेळाडूंनी आता किमान वय 15 वर्षे असणे आवश्यक आहे,” असे आयसीसीने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
अपवादात्मक परिस्थितीत, सदस्य मंडळ 15 वर्षांखालील खेळाडूला त्यांच्याकडून खेळण्याची परवानगी देण्यासाठी आयसीसीकडे अर्ज करू शकतं. यामध्ये खेळाडूचा खेळण्याचा अनुभव आणि मानसिक विकास आणि आरोग्य यांची माहिती दिली जाते. जेणेकरुन ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास पात्र आहेत हे सिद्ध होईल.
आयपीएलमध्ये मात्र किमान वयाची अट नाही, त्यामुळे खेळाडूंचे निर्णय फ्रँचायझींवर सोडले जातात. वैभव सूर्यवंशीला 2025 मध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही हे जवळपास निश्चित आहे. मात्र त्याला यानिमित्ताने राहुल द्रविड आणि कुमार संगकारा यांच्यासारख्या दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंसह काम करण्याची संधी मिळणार आहे.