मुंबई : आयपीएलमधल्या आणखी एका टीमवर निलंबनाची टांगती तलवार आहे. आयपीएलच्या पंजाब टीमचा सहमालक नेस वाडिया याला जपानच्या न्यायालयाने ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणामुळे पंजाबच्या टीमचं निलंबन होऊ शकतं. आयपीएलच्या नियमांनुसार आयपीएलची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न कोणत्याही टीमच्या अधिकृत व्यक्तीने केला, तर त्या टीमचं निलंबन केलं जाऊ शकतं. टीमचं निलंबन करायचं असेल तर पहिले एका समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी होते आणि त्यानंतर समिती आपल्या चौकशीचा अहवाल लोकपालला देते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई आणि राजस्थानच्या टीमचं याच कारणामुळे निलंबन झालं होतं. त्यामुळे पंजाबवरही अशाप्रकारची कारवाई होऊ शकते, असं बीसीसीआयच्या एका सूत्राने आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.


'चेन्नई आणि राजस्थानच्या टीमशी अधिकृत असलेल्या काही जणांवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यामुळे या दोन्ही टीमचं दोन वर्षांसाठी निलंबन झालं होतं. या प्रकरणामध्ये एका टीमचा सहमालक दोषी आढळला असून त्याला शिक्षाही झाली आहे. एका राज्याच्या क्रिकेट संस्थेच्या पदावर असलेली व्यक्ती जर दोषी आढळली असती, तर त्याचं आपोआप निलंबन झालं असतं. बीसीसीआयचे हे नवीन नियम राज्याच्या क्रिकेट संस्थेसाठी कडक आहेत, पण फ्रँचायजीशी संबंधित व्यक्तींसाठी तसे नियम नाहीत. खरंतर खेळाडूंची निवड करताना रणजी ट्रॉफीतल्या कामगिरीपेक्षा आयपीएलच्या कामगिरीवर लक्ष दिलं जातं,' असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.


आयपीएलच्या नियम १४-२ नुसार आयपीएल टीमशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीने मॅच सुरु असताना किंवा मैदानाबाहेर अशी वर्तणूक करु नये, ज्यामुळे आयपीएल, बीसीसीआय, टीम, खेळाडू आणि खेळ यांचं नाव आणि प्रतिष्ठा खराब होईल.  नियम १४-२ चा भंग झाला तर चौकशी समिती आणि लोकपाल त्या टीमचं निलंबन करू शकतात.


चेन्नई आणि राजस्थानच्या टीमवर करण्यात आलेली कारवाई सेक्शन ४, नियम १.१ नुसार होती. यामध्ये होणारी शिक्षा ही जास्त कडक असते. यामुळे चेन्नई टीमचा प्रतिनिधी गुरुनाथ मय्यपन आणि राजस्थानचा सहमालक राज कुंद्रा यांच्यावर बीसीसीआयच्या कोणत्याही मॅचमध्ये सहभागी होण्यावर कायमची बंदी घातली. याचबरोबर चेन्नई आणि राजस्थानचं दोन वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं.


'बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी याप्रकरणावर भाष्य न करणं विचित्र आहे. आपली मैत्री जपण्यासाठी बीसीसीआयची प्रतिमा खराब केली जात आहे का? सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या प्रशासकिय समितीनेही अजूनपर्यंत यावर भाष्य केलेलं नाही. याप्रकरणामुळे आयपीएल आणि बीसीसीआयची प्रतिष्ठा पणाला लागली आहे', अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली.