नवी दिल्ली : काहीच दिवसांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या इरफान पठाण याने जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. रविवारी जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचारात २५ विद्यार्थी जखमी झाले होते. अशाप्रकारच्या घटना देशाची प्रतिमा मलिन करतात, असं इरफान पठाण म्हणाला. पठाणशिवाय गौतम गंभीर आणि ज्वाला गुट्टानेही जेएनयूतल्या घटनेचा निषेध केला आहे. जेएनयूमध्ये हिंसाचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या, अशी मागणी गौतम गंभीरने केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जेएनयूमध्ये जे झालं ती नेहमी होणारी घटना नाही. शस्त्र घेऊन आलेली गर्दी विद्यापीठामध्ये घुसली आणि हॉस्टेलवर हल्ला केला. देशाच्या प्रतिमेसाठी ही घटना चांगली नाही,' असं ट्विट इरफान पठाणने केलं आहे.



रविवारी जेएनयूच्या कॅम्पसमध्ये तोंडाला रुमाल बांधून आणि हातात काठ्या, हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉड घेऊन काही जण घुसले. या जमावाने विद्यार्थ्यांचं हॉस्टेल, गाड्यांवर लोखंडी रॉडने हल्ला केला आणि दगडफेक केली. २ तासांपर्यंत हा हिंसाचार सुरु होता. या हल्ल्यामध्ये २५ विद्यार्थी जखमी झाले.


जखमी झालेल्या १९ विद्यार्थी आणि एका शिक्षकावर एम्समध्ये उपचार सुरु आहेत. या हल्ल्यामध्ये जेएनयू विद्यार्थी संघाची अध्यक्ष आइशी घोषही जखमी झाली आहे. जेएनयू प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आणि कडक कारवाईची मागणी केली आहे.