मुंबई : आयपीएलसाठी कॉमेन्ट्री बॉक्समध्ये बसलेल्या इरफान पठाणची पाकिस्तान दौऱ्यावर असतानाची एक महत्त्वाची स्टोरी आहे. इरफान पठाण याने वयाच्या १८ व्या वर्षी टीम इंडियात स्थान मिळवलं. १८ डिसेंबर २००३ मध्ये पहिला दौरा होता, बॉर्डर गावसकर ट्ऱॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्याच सामन्यात इरफान पठाण स्विंग बॉलिंग करत होता. ऑस्ट्रेलियनना कळतंच नव्हतं, पायात बॉल कुठे फिरतो आणि बाहेर कसा निघतोय. तेव्हा इरफानचे चाहते म्हणत होते, इरफानच्या बॉलिंगवर ऑस्ट्रेलियन बॅटसमन डान्स करतायत. 


या दौऱ्यात इरफान पठाण या बॉलरचं नाव क्रिकेट विश्वात सर्वदूर पसरलं. इरफान पठाणचा क्रिकेट विश्वात दबदबा तयार होण्यास सुरुवात झाली होती. यातंच पाकिस्तानचा दौरा आला. तो दौरा १८ वर्षानंतर होत होता. यामुळे उभय देशांच्या फॅन्समध्ये मोठा उत्साह दिसून येत होता.


या दौऱ्यात सर्वाधिक चर्चा होती, इरफान पठाणच्या बॉलिंगची. दौऱ्याआधीच पाकिस्तानचा माजी क्रिकेटर जांवेद मियांदादने वादग्रस्त वक्तव्य केलं. जावेद मियांदाद म्हणाला, असे बॉलर तर आमच्या पाकिस्तानच्या गल्लीबोळात भरपूर पडीक असतात.


हे वक्तव्य इरफान पठाण याच्या वडिलांच्या कानावर पडलं. ते रागावले, पण इरफान पठाण त्याच्या बाबांना समजावत होता, बाबा हे दबाव आणणे आणि एकाग्रता भंग करण्याचं तंत्र आहे. तुम्ही शांत राहा काहीही बोलू नका.


इरफान पठाण दौऱ्यासाठी पाकिस्तानला निघाला. इरफान पठाणचे वडील मात्र शांत बसले नाहीत. ते लाहोरमध्ये शेवटच्या सामन्याला उपस्थित झाले. इरफानने ३ विकेट काढत, ३-२ ने टीम इंडियाच्या विजयात खारीचा वाटा उचलला.


यानंतर इरफान पठाणचे वडील ड्रेसिंग रुममध्ये जावून इरफानला म्हणाले, मला त्या जावेद मियांदादला भेटायचं आहे. इरफान पठाणने सांगितलं, बाबा तुम्ही तो विषय डोक्यातून काढा हो, पण बाबा काही ऐकायला तयार नव्हत.


तेव्हा इरफान म्हणाला भेटवतो मी तुम्हाला जावेद मियादादला, पण तुम्ही त्याला मागील वक्तव्यावरुन काहीही बोलायचं नाही. 


इरफान पठाणला त्याचे बाबा हो म्हणाले, पाकिस्तानच्या टीम मॅनेजरला इरफानने बोलवलं आणि माझ्या बाबांना जावेद मियांदादला भेटायचं आहे, असं सांगितलं. तेव्हा त्या पाकिस्तानच्या टीम मॅनेजरसोबत इरफानचे वडील मियांदादला भेटायला गेले.


त्या मॅनेजरने ओळख करून दिली. दोघांनी हातात हात दिला. काही बोलण्याच्या आधी जावेद मियांदाद म्हणाला, अरे तुम्हाला सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो, मी ते इरफानविषयी जे वक्तव्य केलं होतं, ते अजिबात तसं नव्हतं, आजकाल मीडियाच असा काही अर्थ बदलून टाकते की काय सांगू...


यावर, इरफानचे वडील मियांदादला म्हणाले, मी काही त्याविषयी बोलायला आलेलो नाही, सहज आलोय भेटायला. परत टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये आल्यानंतर इरफानचे वडील इरफानला आनंदात म्हणाले, अरे तुझं काम मी करून आलोय...