`मी मोठ्याने आऊट म्हणू शकतो पण...`, गाझा पट्टीतील मुलांसाठी इरफान पठाणची भावूक पोस्ट!
Irfan Pathan Post : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने इस्रायल-हमास युद्धामध्ये गाझामधील मुलांच्या हत्येबाबत (Children Dying In Gaza) मौन बाळगल्याने पोस्ट करत टीका केली आहे.
Irfan Pathan On Children Dying In Gaza : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेले युद्ध (Israel Hamas War) आता भीषण रुप धारण करत आहे. गाझामध्ये महायुद्धाला सुरूवात झाल्याचं दृष्य पहायला मिळत आहे. हमासबाबत इस्रायल आणखी आक्रमक झाला आहे. सततच्या बॉम्बफेकीनंतर आता इस्रायली लष्कराने गाझा शहराला चारही बाजूंनी वेढा घातलाय. गाझामधील लोकांचे मोठे हाल झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच लहान मुलांचा जीव (Children Dying In Gaza) देखील गेल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता टीम इंडियाचा माजी स्टार गोलंदाज इरफान पठाण (Irfan Pathan) याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील सेलिब्रिटी, राजकारणी आणि अगदी काही विशिष्ट खेळाडूंनी आपलं मत मांडलं आहे. अशातच आता इरफान पठाण याने देखील टीकेची झोड उठवली आहे.
काय म्हणाला Irfan Pathan?
दररोज गाझामध्ये 0-10 वयोगटातील निष्पाप मुलं जीव गमावत आहेत, तरीही जग शांत आहे. एक खेळाडू म्हणून, मी फक्त आऊट बोलू शकतो, परंतु जागतिक नेत्यांनी एकत्र येऊन या मूर्खपणाच्या हत्येला थांबवण्याची वेळ आली आहे, असं इरफान पठाण (Irfan Pathan) म्हणाला आहे.
दरम्यान, पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायली हवाई हल्ल्यात हजारो लोक मारले गेले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन शुक्रवारी इस्रायलमध्ये आले, गाझामधील युद्धात नागरिकांना होणारी हानी कमी करण्याच्या उपायांवर लक्ष केंद्रित केलं गेलं आहे. जबलिया कॅम्पवरील हल्ल्याचा अरब सरकारांनी तीव्र निषेध केला, ज्याचा इस्रायलने हमास प्रशिक्षण केंद्र म्हणून वापर करत असल्याचं सांगितलं होतं.