भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यावर जोरदार टीका केली आहे. बीसीसीआयने मागील काही वर्षात दिली त्याप्रमाणे त्याला वागणूक देणं बंद केलं पाहिजे असं इरफान पठाण म्हणाला आहे. आपलं मत परखडपणे मांडणाऱ्या इरफान पठाणने हार्दिकने गेल्या काही वर्षात भारतीय संघासाठी फार चांगली कामगिरी केली नसल्याकडे लक्ष वेधलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्या भारतीय संघाकडून 2023 वर्ल्डकपमध्ये अखेरचा खेळला आहे. बांगलादेशविरोधातील सामन्यात घोट्याला दुखापत झाल्याने तो वर्ल्डकपमधून बाहेर पडला होता. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेतही तो खेळू शकला नव्हता. आपण जानेवारी महिन्यात फिट झालो होतो, पण खेळण्यासाठी संधी नव्हती असं नंतर त्याने म्हटलं होतं. अखेर मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून तो आयपीएलमध्ये खेळत आहे. 


इरफान पठाणने परखड शब्दांत मत मांडताना बोर्डाने हार्दिक पांड्याचा प्रभाव अगदी कमी आहे याचा विचार करणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे. "मला असं वाटतं की, भारतीय क्रिकेटने आता स्पष्ट केलं पाहिजे की हार्दिक पांड्याला आतापर्यंत दिली तितकी प्राथमिकता देण्याची गरज नाही. आणि जर तुम्हाला आपण प्राथमिक अष्टपैलू खेळाडू आहोत असं वाटत असेल तर तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर तसा प्रभाव निर्माण करायला हवा. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षित कामगिरी केलेली नाही. आपण फक्त त्याच्यातील क्षमतेचा विचार करत आहोत. आपण आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी यात गोंधळत आहोत. यात मोठा फरक आहे," असं इरफान पठाणने स्टार स्पोर्ट्स प्रेस शो


हार्दिक पांड्या दुखापतीमुळे अनधिकृतपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. इरफान पठाणने हार्दिक पांड्या निवडण्याचा पर्याय देणं बंद केलं पाहिजे असं स्पष्ट मत मांडलं आहे. आयपीएल सुरू होण्याअगोदर, बीसीसीआयने श्रेयस अय्यर आणि इशान किशनला वार्षिक करारातून वगळलं होतं. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यावरही कारवाई होणार होती अशी माहिती आहे. पण त्याने देशांतर्गत स्पर्धांसाठी उपलब्ध राहू असं आश्वासन दिल्याने कारवाई टळली. इरफान पठाणने यशस्वी संघात एक नव्हे तर अनेक योगदानकर्ते असतात असं सांगत ऑस्ट्रेलियाचं उदाहरण दिलं. 


"सर्वात प्रथम म्हणजे त्याने संपूर्ण वर्ष खेळायला हवं. तो स्वत: निवडू शकत नाही. भारतीय क्रिकेटने हे करणं बंद केलं पाहिजे. एखाद्या खेळाडूला प्राथमिकता देणं थांबवा, अन्यथा तुम्ही मोठ्या स्पर्धा जिंकू शकणार नाही. ऑस्ट्रेलिया गेल्या अनेक वर्षांपासून टीम गेमवर लक्ष केंद्रीत करत आहे. ते प्रत्येकाला सुपरस्टार बनवत आहेत. एक नव्हे तर प्रत्येकजण सुपरस्टार आहे. जर तुम्ही तसं केलं नाही तर मोठ्या स्पर्धा जिंकणार नाही," असं पठाण म्हणाला आहे.