धोनी-गांगुली नाही, इरफानची या भारतीय कर्णधाराला पसंती
भारताचा ऑल राऊंडर इरफान पठाणने शनिवारी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला.
मुंबई : भारताचा ऑल राऊंडर इरफान पठाणने शनिवारी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. इरफानने २००६ साली कराची टेस्टमध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच ओव्हरला घेतलेली हॅट्रिक कोणताच भारतीय क्रिकेट चाहता विसरणार नाही. २००७ सालच्या टी-२० वर्ल्ड कप फायलनमध्ये इरफान पठाण मॅन ऑफ द मॅच ठरला. इरफान पठाणच्या कामगिरीमुळे भारताने टी-२० वर्ल्ड कप जिंकला.
इरफान पठाणने सौरव गांगुलीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण राहुल द्रविड कर्णधार असताना पठाण टीम इंडियाचा महत्त्वाचा हिस्सा राहिला. धोनीच्या नेतृत्वातही पठाण भारताकडून खेळला.
निवृत्तीनंतर झालेल्या मुलाखतीमध्ये इरफानला तुझा आवडता कर्णधार गांगुली का द्रविड? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मला सगळ्यांच्या नेतृत्वात खेळताना मजा आली. गांगुली हा खास कर्णधार होता, त्याच्या नेतृत्वाचं सगळेच कौतुक करतात. भारतीय टीम कठीण काळातून जात असताना गांगुलीने टीमचं नेतृत्व केलं. भारतीय क्रिकेटला त्याने योग्य दिशा दाखवली, ज्याचा आम्हाला फायदा झाला, असं पठाण म्हणाला.
राहुल द्रविडने माझा सगळ्यात चांगला वापर करुन घेतला. फक्त बॉलिंगच नाही, तर माझी बॅटिंगही द्रविड कर्णधार असताना सुधारली. द्रविडच्या नेतृत्वात तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करताना माझी सरासरी ३२ एवढी होती. द्रविडनंतर मला वरच्या फळीत खेळण्याची संधी मिळाली नाही, अशी खंत पठाणने बोलून दाखवली.
२००८ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हरभजन-सायमंड्स वाद अनिल कुंबळेने योग्य पद्धतीने हाताळला. प्रत्येकालाच असा तणाव झेलणं शक्य होत नाही. आमच्या सगळ्यांवरच तेव्हा दबाव होता. पण कुंबळेने सगळ्यांना सोबत घेतलं आणि आम्ही पर्थमध्ये टेस्ट मॅच जिंकलो. अनिल कुंबळेदेखील चांगला कर्णधार होता, असं पठाणने सांगितलं.
३५ वर्षांच्या इरफान पठाणने २०१२ साली भारताकडून शेवटची मॅच खेळली. इरफान पठाणने तिन्ही फॉरमॅटच्या १७३ मॅचमध्ये ३०१ विकेट घेतल्या आणि २,८२१ रन केले.