किंगस्टन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवार ३० ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या मॅचमध्ये भारताचा फास्ट बॉलर इशांत शर्माला कपिल देव यांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. इशांत शर्माने ९१ टेस्ट मॅचमध्ये २७५ विकेट घेतल्या आहेत. यातल्या १५५ विकेट इशांतने आशिया खंडाबाहेर घेतल्या आहेत. दुसऱ्या टेस्टमध्ये इशांतने एकही विकेट घेतली, तर तो आशिया खंडाबाहेर भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा फास्ट बॉलर ठरेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया खंडाबाहेर सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेंच्या नावावर आहे. कुंबळेने ५० मॅचमध्ये २०० विकेट घेतल्या. यानंतर कपिल देव आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी १५५-१५५ विकेट घेतल्या आहेत. योगायोगाने या दोघांना एवढ्या विकेट घेण्यासाठी प्रत्येकी ४५-४५ मॅचच लागल्या.


आशिया खंडाबाहेर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरमध्ये झहीर खान चौथ्या क्रमांकावर आहे. झहीरने ३८ मॅचमध्ये १४७ विकेट घेतल्या आहेत. हरभजनने आशियाबाहेर ३२ मॅचमध्ये ११७ विकेट घेतल्या. अश्विनला २० टेस्टमध्ये ६५ विकेट मिळाल्या.


इशांत शर्मा हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये त्याने ८ विकेट घेतल्या होत्या. इशांतच्या या कामगिरीमुळे भारताचा ३१८ रननी विजय झाला.


भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेंच्या नावावर आहे. कुंबळेने टेस्ट क्रिकेटमध्ये ६१९ विकेट घेतल्या. जगात सर्वाधिक टेस्ट विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कुंबळे तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुथय्या मुरलीधरन (८०० विकेट) आणि शेन वॉर्न (७०८ विकेट) हे कुंबळेच्या पुढे आहेत.


भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या फास्ट बॉलरच्या यादीत इशांत शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. कपिल देव यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये ४३४ विकेट घेतल्या आहेत, तर झहीर खानने ३११ विकेट घेतल्या. इशांत शर्माच्या टेस्ट क्रिकेटमध्ये २७५ विकेट झाल्या आहेत. झहीर खानचा रेकॉर्ड मोडण्यासाठी इशांतला ३७ विकेटची गरज आहे.