विराट सचिनचं रेकॉर्ड मोडणार का? कॅलिसने दिलं उत्तर
भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली हा सध्या जगातला सर्वोत्तम बॅट्समन आहे.
कोलकाता : भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली हा सध्या जगातला सर्वोत्तम बॅट्समन आहे. अनेकवेळा विराट कोहलीची तुलना ही सचिन तेंडुलकरसोबतही होते. विराट कोहली हा सचिन तेंडुलकरचा १०० आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडेल, असं मतही अनेकांनी व्यक्त केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॅक कॅलिस यालाही विराट सचिनचं रेकॉर्ड मोडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. 'याचं उत्तर विराटच देऊ शकतो. गोष्टींना साधं, सरळ आणि सोपं ठेवण्याची क्षमता असणं हे विराटचं वैशिष्ट्य आहे,' असं वक्तव्य कॅलिसने केलं.
३० वर्षांच्या विराटनं आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीने आत्तापर्यंत ६६ शतकं केली आहेत. यामध्ये वनडे क्रिकेटच्या ४१ आणि टेस्ट क्रिकेटच्या २५ शतकांचा समावेश आहे.
जगातला सर्वोत्तम ऑलराऊंडर म्हणून नावाजला गेलेला कॅलिस म्हणाला, 'कोहली हा त्याला जितकं वाटतं तेवढा पुढे जाऊ शकतो. तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. त्याचमध्ये आणखी चांगली कामगिरी करण्याची भूक आहे. विराट कठोर परिश्रमही करतो. त्याने इतकी वर्ष स्वत:ला सिद्ध केलं आहे. तो गोष्टी साध्या, सरळ आणि सोप्या ठेवतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर विराट फिट राहिला आणि त्याची पुढे जायची इच्छा असेल, तर कोणतंही रेकॉर्ड मोडणं त्याला कठीण नाही.'