टेस्ट रॅकिंगमध्ये सर जडेजा पहिल्या क्रमांकावर कायम
श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट भारतानं तब्बल ३०४ रन्सनी जिंकली यानंतर जाहीर झालेल्या टेस्ट रॅकिंगमध्ये भारतीय खेळाडूंच्या क्रमवारीत फारसा बदल झालेला नाही.
कोलंबो : श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट भारतानं तब्बल ३०४ रन्सनी जिंकली यानंतर जाहीर झालेल्या टेस्ट रॅकिंगमध्ये भारतीय खेळाडूंच्या क्रमवारीत फारसा बदल झालेला नाही. बॉलर्सच्या यादीमध्ये रवींद्र जडेजा पहिल्या क्रमांकावर कायम आहे तर तिसऱ्या क्रमांकावर असणारा रवीचंद्रन अश्विन हा आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
बॅट्समनच्या यादीमध्ये चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर कायम आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये पुजारानं तर दुसऱ्या इनिंगमध्ये कोहलीनं शतक झळकावलं होतं पण या शतकामुळे दोघांच्या रॅकिंगमध्ये मात्र कोणताही बदल झालेला नाही. या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये १९० रन्सची खेळी करणारा शिखर धवन २१व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
बॅट्समनच्या रॅकिंगमध्ये स्टीव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर कायम आहे. स्मिथनंतर इंग्लंडचा जो रूट दुसऱ्या आणि न्यूझीलंडचा केन विलियमसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑल राऊंडरच्या यादीमध्ये बांग्लादेशचा शाकीब अल हसन पहिल्या क्रमांकावर आहे तर रवींद्र जडेजा दुसऱ्या आणि आर. अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
टीम रॅकिंगमध्ये भारत अव्वल क्रमांकावर कायम आहे. दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आणि तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. यानंतर इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडिज, बांग्लादेश आणि झिम्बाब्वेचा नंबर लागतो.