बारबाडोस : येथे सुरु असलेल्या तीन कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने इयन बॉथम यांच्या विक्रमाची बरोबरी केली. जेम्स अँडरसनने वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने ३० षटकांपैकी १३ निर्धाव षटके टाकून ४६ धावा देत ५ विकेट घेतल्या. या पाच विकेट घेण्यासोबतच अँडरसनने विक्रमाची बरोबरी केली. अँडरसनने २७ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. अँडरसनच्या भेदक माऱ्यामुळे वेस्ट इंडिजचा पहिला डाव २८९ धावांवर आटोपला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिज संघाने पहिल्या दिवसाच्या अखेरीस चार विकेट लवकर गमावल्या. त्यामुळे त्यांची धावसंख्या ८ बाद २६४ अशी झाली. अँडरसनने अलजारी जोसेफ याला जॉस बटलरच्या हाती स्लीपमध्ये झेलबाद केले. या विकेटसोबतच अँडरसनने इंग्लंड संघाकडून डावामध्ये सर्वाधिक विकेट घेणारे इयन बॉथम यांच्या विक्रमाची बरोबरी केली. या ५ व्या विकेट सोबतच अँडरसनचे कसोटीत एकूण ५७० विकेट झाल्या आहेत.


 



वेस्ट इंडिजने दिलेल्या २८९ धावांचा पाठलाग करायला आलेल्या इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ७७ धावांमध्ये गुंडाळला. या मैदानावरील सर्वात कमी धावसंख्या करण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावे झाला आहे. तसेच कसोटीत वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंडचीही चौथी सर्वात कमी धावांची खेळी ठरली आहे. त्यामुळे यजमान वेस्ट इंडिजला दुसऱ्या डावामध्ये २१२ धावांची मोठी आघाडी मिळाली.  वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात दिवसाचा खेळ संपेपर्यंत  ६ विकेट गमावून १२७ धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजकडे सध्या ३३९ धावांची आघा़डी आहे. 


इंग्लंडचा संघ सध्या तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना बुधवार २३ तारखेपासून ब्रिजटाऊन येथे खेळला जात आहे. याआधी वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात वेस्ट इंडिजने सर्व बाद २८९ धावा केल्या. यजमान वेस्ट इंडिजच्या तीन फलंदाजाना भोपळाही फोडता आला नाही तर दोन फलंदाजाना दुहेरी धावसंख्याही करता आली नाही.


यजमानांचा पहिला डाव


वेस्ट इंडिजची पहिली विकेट ५३ धावांवर गेली. सलामीवीर जॉन कॅम्बेल याला ४४ धावांवर फिरकीपटू मोईन अली यांने पायचीत केले. यानंतर आलेल्या शाई होप याच्या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावा जोडल्या. वेस्ट इंडिजची दुसरी विकेट १२८ वर गेली. वेस्ट इंडिजच्या पहिल्या सहा फलंदांजांना डॅरेन ब्राव्होचा अपवाद वगळता चांगली सुरुवात मिळाली, पण त्यांना आपल्या खेळीला मोठ्या धावांमध्ये परावर्तित करता आले नाही. वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रेथवेट ४०, जॉन कॅम्बेलने ४४, शाई होप, रोस्टन चेस आणि शिमरोन हेटमेयर यांनी अनुक्रमे  ५७, ५४ आणि  ८१ धावांची खेळी केली. या फलंदाजांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याच खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. या तिन्ही खेळाडू्ंच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजला २८९ धावा करता आल्या. इंग्लंडकडून ५ विकेट्स जेम्स अँडरसनने घेतल्या तर बेन स्टोकसने ४ तर मोईन अलीने १ विकेट घेत अँडरसनला चांगली साथ दिली.


इंग्लंडचा पहिला डाव


वेस्ट इंडिजने पहिल्या डावात दिलेल्या २८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या पाहुण्या इंग्लंडची दाणादाण उडाली. इंग्लंडचा डाव अवघ्या ७७ धावांवर आटोपला. इंग्लंडच्या कोणत्याच फलंदाजाला २० धावाही करता आल्या नाही. इंग्लंडच्या सहा फलंदाजाना दुहेरी धाव देखील करता आली नाही. इंग्लंडकडून  सर्वाधिक १७ धावा या कीटन जेनिंग्सने केल्या. ७७ धावांवर इंग्लंडचा पहिला डाव गुंडाळल्याने वेस्ट इंडिजला दुसऱ्या डावात २१२ धावांची आघाडी मिळाली. केमार रोचने इंग्लंडसाठी ११ षटाकातून ७ निर्धाव टाकत केवळ १७ धावा देत ५ विकेट्स घेतले.


दुसऱ्या डावात खेळायला आलेल्या वेस्ट इंडिजची धावसंख्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ६ बाद १२७ अशी आहे. वेस्ट इंडिजला मिळालेल्या २१२ धावांच्या आघाडीमुळे वेस्ट इडिंजकडे ३३९ धावांची आघाडी आहे. पहिल्या डावात ४४ धावा केलेल्या सलामीवीर जॉन कॅम्बेलने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३३ धावांची खेळी केली. तसेच क्रेग ब्रेथवेट, शिमरोन हेटमेयर अनुक्रमे २४ आणि  ३१ धावांची खेळी केली. शेन डोवरिच आणि जेसन होल्डर हे नाबाद आहेत. वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर बेन स्टोक्स आणि सॅम करण याने प्रत्येकी २ आणि १ विकेट घेतल्या.