ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई : क्रिकेट विश्वचषकाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाच आयपीएलचा यंदाचा हंगाम चांगलाच रंग धरु लागला आहे. अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या आयपीएलचीच सर्वत्र हवा असताना महिलांत्या आयपीएल सामन्यांनीही साऱ्या देशाचं लक्ष वेधलं आहे. महिलांच्या आयपीएल सामन्यांसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे जासिया अख्तर. जासिया ही खास आहे, कारण काश्मिरमधील ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२८ वर्षीय जासिया ही आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधीत्व करणारी पहिली काश्मिरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. महिलांच्या २०-२० 'रन'संग्रामध्ये निवड झालेलीही पहिलीच काश्मिरी महिली क्रिकेटपटू. जासियाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून इथंवर मजल मारली. जम्मू काश्मीरमधील सोफिया जिल्ह्यातील  ब्रारिपोरा या दुर्गम गावातील एका गरीब कुटुंबात जासियाचा जन्म झाला. तिचे वडील रोजंदारीवर काम करतात. अशा परिस्थितीतही जासियानं क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. 


क्रिकेटच्या प्रेमापोटी तिने २०१३मध्ये जम्मू-काश्मीर सोडले आणि पंजाबला गेली. मोहिलीमधील एका सामन्यातील तिची कामगिरी पाहून तिचे प्रशिक्षक प्रभावित झाले आणि त्यांनी तिला पंजाबकडून क्रिकेट खेळण्याची संधी दिली. तिच्यातील गुणवत्ता पाहून तिला राष्ट्रीय वरिष्ठ महिला शिबिरासाठी पाचारण करण्यात आलं. त्यानंतर चॅलेंजर ट्रॉफीमध्ये ती इंडिया रेडकडून खेळली. श्रीलंका इलेव्हन क्रिकेट संघाविरुद्ध तिनं नाबाद ४४ धावांची शानदार खेळी केली. आता तर तिची महिलांच्या आयपीएलसाठी निवड झाली. 


आपल्या वाट्याला आलेल्या या संधीविषयी सांगत ती म्हणाली, 'अनेकजणांनी माझी निवड होणार नाही असं सांगितलं होतं. मात्र मला आत्मविश्वास होता. क्रिकेट हे माझं विश्व आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या क्षणासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला आपला आनंद शब्दात व्यक्त करु शकत नाही.' 



आयपीएलमध्ये जासियाचा ट्रेलब्लेझर्स या संघात समावेश आहे. दरम्यान, पहिल्या सामन्यात जरी तिला संधी मिळाली नसली तरी तिची वाटचाल आता उज्ज्वल भवितव्याकडे सुरु झाली आहे हे मात्र खरं. तिची ही एकंदर वाटचाल आणि यशोगाथा पाहता काश्मिरमधील दगड हाती घेणाऱ्या युवकांनी जासियाचा आदर्श घ्यावा आणि त्यांच्या हातून काहीतरी विधायक कार्य घडावं अशीच इच्छा आणि अपेक्षा समाजातून व्यक्त करण्यात येत आहेत.